Aurangabad News: आपला व्यवसाय चांगला चालवा आणि ग्राहक यावेत यासाठी प्रत्येक व्यवसायिक प्रयत्न करतो. मात्र औरंगाबादच्या काही व्यावसायिकांनी भलतच काही केल्याने त्यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. कारण महामार्गावरील आपल्या दुकानात ग्राहकांनी सहजपणे यावे यासाठी काही व्यावसायिकांनी चक्क महामार्गावरील लेनच्यामध्ये असलेले दुभाजक तोडून वळण रस्ता तयार केला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा 15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहे. ज्यामध्ये पाच वर्षापर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे.
अपघाताच्या दृष्टीने महामार्गावरील दोन लेनमध्ये दुभाजक करण्यात येतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आपापल्या लेनवरून प्रवास करतांना दुसऱ्या बाजूच्या येणाऱ्या वाहनांचा धोका किंवा अपघात होऊ नयेत म्हणून मध्यभागी दुभाजक तयार करण्यात येतात. मात्र औरंगाबादच्या ग्रामीण भागातील महामार्गावरील दुभाजक अनेक ठिकाणी तोडण्यात आल्याचे पोलिसांना पाहायला मिळाले. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आपल्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये ग्राहकाने यावे यासाठी महामार्गावरील काही व्यावसायिकांनी दुभाजक तोडले असल्याचे समोर आले होते.
पोलिसांकडून गुन्हे दाखल...
दुभाजक तोडुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करून कृत्रिम वळण रस्ता तयार केल्याने वाहनचालक या कृत्रिम वळणातुन अचानक वळण घेतल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अनाधिकृतपणे लेनच्या मध्ये असलेले दुभाजक तोडणाऱ्या 15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यात कन्नड ग्रामीण, खुलताबाद, पाचोड, गंगापुर, करमाड, या पोलीस ठाणे अंतर्गत हॉटेल व्यवसाईक, पेट्रोलपंप चालक, फॉर्म हाऊस मालक, वॉशिंगसेटर मालकांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तर महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माध्यमांतून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले...
- कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे: हॉटेल मावली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमुर्ती, गर्जे फार्म हाऊस, हादगाव वॉशिंग सेंटर सर्व कन्नड हायवे वरिल आहेत.
- खुलताबाद पोलीस ठाणे: हॉटेल आम्रपाली, हॉटेल रोहीणी सर्व कसबाखेडा ते पळसवाडी या महामार्गावरीलआहेत.
- गंगापुर पोलीस ठाणे: हॉटेल बटर फलाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोल पंप, हॉटेल जिजावु, गॅनोज कंपनी, एच.पी. पेट्रोलपंप, हॉटेल इंडियन ढाबा, ग्रामपंचायत ढोरेगाव
- पाचोड पोलीस ठाणे: आडुळ बायपास जवळ माऊली लॉन्स समोर रजापुर, डाभरुळ गावा जवळ अज्ञात व्यक्तीविरोध्दात.
- करमाड पोलीस ठाणे: औरंगाबाद ते जालना रोडवर करमाड गावाजवळील रोडवरील दुभाजक अज्ञात व्यक्ती विरूध्द.