Pune Crime news : पुण्यामध्ये कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून दुकानदारांकडून (Pune Crime news) पैसे वसूल करत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील मांजरी भागात (Pune Manjari ) कोयता गॅंंगची दहशत बघायला मिळत आहे. पुण्यात गुंडगिरीने चांगलेच डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतंय. पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार बघायला मिळत आहे. 


हत्या आणि बलात्काराच्या घटनांचं प्रमाण पुण्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र आता पुण्यात हातात कोयते घेऊन तरुणांना तसेच व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचं चित्र आहे. कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे. त्यामुळे हडपसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोयता गॅंंगमुळे अनेक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 


नागरिकांच्या वारंवार तक्रारी
या कोयत्या गॅंगमुळे हडपसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक व्यापारी आणि लहान भाजी विक्रेते या गॅंंगमुळे धास्तावले आहेत. या संदर्भात अनेकदा व्यापाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.  पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतात मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या गॅंंगची दहशत वाढतच चालली आहे. 


व्यापारी म्हणतात,  या कोयता गॅंंगमुळे आम्हाला त्रास होत आहे, शिवाय त्यांच्या दहशतीमुळे लहान व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवर देखील मोठा परिणाम होत आहे. अनेक लोक या गँगमुळं धास्तावले आहे. लहान मुलांनाही या गँगकडून धमक्या येत आहेत. यामुळे मुलांसह पालकही धास्तावले आहे. त्यामुळे या गॅंंगचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून मागणी केली जात आहे. 


पोलीस कधी गांभीर्य ओळखणार?
परिसरातील प्रत्येक नागरिकाला या गॅंंगमुळे घराबाहेर पडणं कठिण झालं आहे. पोलिसांनाही तक्रारी देऊन कोणताही बंदोबस्त केला जात नसल्याचं चित्र आहे. पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य कधी ओळखणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या गॅंंगचे सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. या गँगला वैतागलेल्या मांजरी मधील नागरिकांनी आज धडक मोर्चा काढला. लवकरात लवकर या दहशत पसरवणाऱ्या गँगवर कारवाई व्हावी यासाठी नागरिक रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहे.