पुणे : पुण्यात अनेक फसवणुकीच्या बातम्या समोर येत (Pune Crime News) असतात. मात्र आता थेट पुमा (Puma) कंपनीचा बनावट लोगो  वापरुन ग्राहकांना कपड्यांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कपड्यांची विक्री करुन या दुकानदाराने अनेकांची फसवणूक केली आहे. फसवणूक करत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली आणि कोंढवा पोलिसांनी कारवाई करत कपडे जप्त केले आहेत.  याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोंढवा खुर्द येथील जिजामाता कॉम्पलेक्समधील रायबा फॉर मेन्स या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. 


याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर  महेंद्र सोहन सिंग यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल दिलीपराव पिसाळ  याच्यावर कॉपीराईट अॅक्ट (Copyright Act) कलम 63, 64, 65 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आर.एन.ए.आय.पी एटोर्नी कंपनीचे फिल्ड ऑफिसर आहेत. याच कंपनीला पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा अधिकृत लोगो आणि नावाचा गैरवापर करुन कपड्यांची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली होती. या सगळ्याची शाहनिशा करुन पोलिसांनी छापा टाकला आणि सगळे कपडे जप्त केले आहेत. 


 300 ट्रॅक पॅन्ट अन् बरंच काही...


पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे पुमा कंपनीच्या एकूण 300 ट्रॅक पॅन्ट व 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे पुमा कंपनीचे 225  टी शर्ट जप्त केले आहे. पोलिसांनी या कारवाईत 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि दुकान मालक विशाल पिसाळ याच्यावर कॉपराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


अवैध व्यावसायावर पोलिसांची नजर...


पुण्यात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यासोबतच फसवणूक करण्याऱ्यांची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलीस कारवाई करताना दिसत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी असे लोगो बनावट लोगो वापरुन व्यावसाय केला जातो. अनेक परिसर खास या बनावट वस्तूंसाठी प्रसिद्धदेखील आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर पुणे पोलिसांची करडी नजर असते. माहिती मिळाल्यावर त्या दुकानाची किंवा स्टॉल्सची संपूर्ण शाहनिशा करुन पोलीस थेट कारवाई करताना दिसत आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे अनेक परिसरात पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune ACB Trap : 'त्या' लाचखोर वैद्यकीय महाविद्यालयीन डीनवर अखेर कारवाई; 10 लाखांची लाच घेणं चांगलंच भोवलं