पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Pune Crime News) सोमवारी दुपारच्या सुमारास एका तरुणाचा खून झाला होता. गोपाळ कैलास मंडवे (वय 32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंडवे हा पुणे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या खुनातील आरोपीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या. या खुनाचे कारण समोर आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सिद्धांत दिलीप मांडवकर (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गोपाळ मंडवे यांचा भाऊ योगेश कैलास मंडवे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी विरोधात 302 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी सिद्धांत मांडवकर याचे मयत गोपाळ मंडवे यांच्या नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याबाबत गोपाळ याला माहिती मिळाली होती. त्यावरून दोघात वाद सुरू होते. दरम्यान सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठीच आरोपी आणि फिर्यादी एकत्र जमले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाले आणि आरोपीने धारदार हत्याराने वार करून गोपाळचा खून केला.
आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. खून केल्यानंतर तो पसार झाला होता. पुणे पोलीस त्याच्या शोधात असताना गणेशाच्या पोलिसांना तो कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयासमोर थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
क्षुल्लक कारणावरुन हत्या
सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गॅंगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षृल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे सगळं रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे.
इतर महत्वाची बातमी-