पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना (ACB Trap) 16 लाख रुपयांची लाच (ACB Trap)  घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता पालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाच घेणं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना चांगलंच महागात पडलं आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


महाविद्यालयाच्या डीनला तबल 10 लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. त्यांनी 16 लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आला होता. याबाबत पुण्यातील 49 वर्षीय डॉक्टर यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मुलगा नीट परिक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे तक्रारदार हे लोकसेवक आशिष बनगिनवार यांना मुलाचे एम.बी.बी.एस. च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी भेटले होते. दरम्यान, नियमानुसार दरवर्षाची प्रवेश फी ही 22 लाख 50 हजार रुपये असते. मात्र डीन डॉ. आशिष यांनी या व्यतिरिक्त प्रवेशासाठी त्यांच्याकडे अधिकच्या 16 लाख रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबत यातील तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. 


तपास समितीने घेतला निर्णय...


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशिष बनगिनवार दोषी आढळल्यानं त्यांना सेवेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


डीन विरोधात आंदोलनं अन् तोडफोड


अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची तोडफोड केली होती. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी डीन विरोधात आंदोलन छेडलं होतं. याच आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी डीनच्या खुर्चीला नोटांचा हारही घातला होता. शिक्षणाच्या माहेरघरात प्रवेशासाठी असं बाजारीकरण सुरु असल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pune Crime news : हॉटेलवरच चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी सापळा रचना अन् थेट छापा टाकला...