Pune Crime News : पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात मागील काही दिवसांपासून गाड्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक परिसरातून सध्या गाड्या चोरीला जात आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी 22 चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 15 लाख 40 हजार रुपये आहे.
ओंकार दिलीप गवारे (वय 23, रा. पिंपळे सौदागर) आणि महेश महादेव दणाणे (वय 21, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्हेगारी कृत्यात एका अल्पवयीन आरोपीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी शहरभर गस्त वाढवली आहे. पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात दुचाकी चोरी करण्यात सहभागी असलेले गवारे आणि दणाणे हे थेरगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
वाकड पोलिसांनी सुनियोजित सापळा रचून संशयितांना अटक केली. त्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपींनी एकूण 22 गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 लाख 40 हजार रुपये किमतीच्या एकूण 22 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी काही दुचाकी त्यांच्या नातेवाईकांना विकल्या असून चोरीची वाहने खरेदी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गाड्या पकडण्यासाठी शहरातील अनेक CCTV कॅमेरे तपासण्यात आले. हे कॅमेरे तपासून अनेक परिसरातून गाड्या जप्त केल्या आहेत. या चोरांनी पिंपरी परिसरातून रात्रीच्या आणि दुपारच्या वेळी या गाड्या चोरल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
गाड्या चोरणाऱ्यांना बेड्या
कालच पुण्यातील विविध परिसरातून yamaha RX 100 गाड्या चोरत असल्याचं समोर आलं होतं. एखादी गाडी आवडली की उचलायची, अशी मोहीम पुण्यातील काही भुरट्या चोरांनी सुरु केली. पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून यामाहा कंपनीच्या आणि त्याही फक्त आर एक्स हंड्रेड मॉडेलच्या गाड्या चोरीला जात होत्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांना आज देखील मोठी मागणी असून हौशी लोक लाखों रुपयांना या गाड्या खरेदी करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील दोन तरुणांनी शहरातून या गाड्या चोरण्याचा सपाटा लावला होत. चोरांनी तब्बल 16 गाड्या चोरल्या होत्या. यासाठी चोरांना 440 CCTV तपासावे लागले होते.
संबंधित बातमी-
Pune Crime News : काय सांंगता? पुण्यात चक्क PMPML बसची चोरी, नेमकं काय घडलं?