Nashik Saptshrungi Devi : वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ अशी महती असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) देवस्थानने सावध भूमिका घेतली आहे. राज्यातील इतर सर्व शासकीय देवस्थानात वस्त्रसंहिता (Dress code) बाबत जो काही निर्णय घेतला जाईल. त्याचा विचार करुन योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असं संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरामध्ये वस्रसंहितेबाबत निर्णय घेतले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. त्यातच गुरुवारी सप्तशृंगी गड मंदिर संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी व्ही वाघ यांच्या उपस्थितीत मंदिराच्या विश्वस्तांची बैठक नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या संस्थानच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पार पडली. वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने (Vani Grampanchayat) 29 मे च्या मासिक बैठकीत केलेल्या ठरावावरही या बैठकीत चर्चा झाली. दर्शनासाठी येताना महिलांसोबतच पुरुषांनी पूर्ण पेहराव परिधान करावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले होते. 


दरम्यान एकीकडे संस्थानकडून जरी बैठकीनंतर हे स्पष्टीकरण दिले जात असले तरी, मात्र दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार लवकरच आणखी एक बैठक घेतली जाऊन त्यात वस्त्रसंहितेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर महत्वाच्या मंदिरामध्ये वस्रसंहितेबाबत निर्णय घेतला जात असताना सप्तशृंगी गडावर वस्र संहितेबाबत मंदिर व्यवस्थापनाने सावध भूमिका घेतली आहे. गुरुवारी महत्वपूर्ण बैठक झाली असताना या बैठकीतही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आगामी काळात योय तो विचार करून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


वस्र संहितेबाबत निर्णय नाही.... 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिरातही (Saptshrungi Devi Mandir) ड्रेसकोड लागू करण्याबाबत मंदिर प्रशासन अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या संदर्भात एकही दिवसांपूर्वीच वणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच ड्रेसकोड लागू करावा, याबाबत ठराव करुन सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टकडे दिला आहे. त्यावेळी मंदिर समितीकडून ड्रेसकोड लागू करण्याबाबत कोणताही घेतला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता याबाबत गुरुवारी विश्वस्तांमध्ये महत्वपूर्ण बैठकीतही निर्णय घेतला गेला नसल्याने वस्र संहिता लागू होणार कि नाही याबाबत अद्यापही सांशकता आहे.