Pune crime news: पुण्यात (Pune) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला आहे. या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. 2016 ते 18 ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती. याच दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. त्यानंतर 2018 मध्ये ती मुलगी पुण्यात आली. त्यावेळी आईवडिलांना तिने पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र त्यानंतर वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं पीडितेनं समुपदेशादरम्यान सांगितलं. 


यापूर्वीदेखील समुपदेशनाच्या वर्गातून धक्कादायक प्रकार समोर आला होता. सात वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते. समुपदेशनासाठी शाळेत गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित मुलीची चौकशी केली होती. त्यानंतर तिने तिसरीत असताना सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 15 वर्षीय पीडित मुलगी शाळेत दहावीत शिकत आहे. शालेय विद्यार्थिनींना चांगल्या आणि वाईट स्पर्शांबाबत प्रबोधन करण्यासाठी समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समुपदेशनासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यासमोर तरुणीने आपली व्यथा मांडली. पीडित मुलगी जेव्हा तिसऱ्या वर्गात होती तेव्हा आरोपीने तिला घरी बोलावले ज्याबद्दल तिला जास्त माहिती नव्हती. त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती तिने चौकशीत दिली होती


...यामुळे समुपदेशन गरजेचं
सध्या पुण्यात अनेक शाळा- कॉलेजच्या मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थीनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. कधी काळी त्यांच्यावर अशा पद्धतीने काही गैरवर्तन केलं का? ते तुमचे कोण होते? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांचा शाळकरी मुलींना फायदा होत आहे आणि यातून रोज नवे प्रकरणं समोर येत असून त्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल होत आहे.