Aurangabad News: 'ऑटो हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या इंडस्ट्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. आयआयएफएलच्या (IIFL) वेल्थ हुरून इंडिया रिचेस्ट लिस्ट 2022 ने केलेल्या एका सर्व्हेमध्ये देशातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबादच्या सहा उद्योजकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. 


'ऑटो हब' म्हणून औरंगाबादची एक वेगळी ओळख उद्योग क्षेत्रात निर्माण झाली आहे. बजाज, स्कोडा ,एनड्युरन्स टेक्नोलॉजी, एनड्युरन्स, अशी औरंगाबादच्या इंडस्ट्रीमध्ये छोटी मोठी एकूण चार हजार उद्योग आहेत. मात्र आता याच औरंगाबादच्या इंडस्ट्रीला नावलौकिक मिळालय ते आयआयएफएलने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या नावाच्या यादीमुळे, कारण या यादीत औरंगाबादच्या सहा उद्योजकांचा समावेश झाला आहे. 


कोण आहेत अब्जाधीश उद्योजक... 




अनुरंग जैन 


अनुरंग जैन हे उद्योगपती राहूल बजाज यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी 1985 मध्ये एनड्युरन्स टेक्नोलॉजी ही कंपनी सुरू केली. त्यांच्या भारतात 17, तर युरोपमध्ये 10 कंपन्या आहेत. तसेच आयआयएफएलच्या यादीत अनुरंग जैन हे 80 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची 20 हजार 800 कोटींची मालमत्ता आहे. 




श्रीकांत बडवे 


श्रीकांत बडवे यांचे औरंगाबादसह पुण्यात उद्योग आहेत. बडवे इंजिनिअरिंग ही त्यांची कंपनी असून, ऑटोमोबाईल्स व ऑटो कॉम्पोनंटसचे ते उत्पादन करते. त्यांची संपत्ती 13 हजार 900 कोटींवर आहे. 
 




मन्नालाल अग्रवाल


मन्नालाल अग्रवाल हे अजंता फार्माचे सहसंस्थापक आहे. त्यांच्या कंपनीतून औषधी उत्पादन होते. तर भारतासह आफ्रिकेत त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. तसेच गुवाहाटीमध्ये नवीन प्रकल्पांत त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांची संपत्ती 5 हजार 100 कोटींच्या घरात आहे. 




तरंग जैन 


तरंग जैन यांची व्हेरॉक इंजिनिअरिंग कंपनी असून, त्यात दुचाकी, तीनचाकी वाहनाला लागणाऱ्या लायटिंग सिस्टमचे उत्पादन तयार होते. जगभरात यांच्या 37 कंपन्या आहेत. तर त्यांची 4 हजार 400 कोटींवर संपत्ती आहे. 




अशोककुमार सिकची 


अशोककुमार सिकची यांच्या पाच कंपन्या केमिकल, लाईफ सायन्सशी निगडित उत्पादन करतात. ज्यात मराठवाडा केमिकल इंडस्ट्रीज, मराठवाडा केमिकलसह त्यांच्या आदी कंपन्या आहेत. त्यांची 4 हजार 100 कोटींची संपत्ती आहे. आयआयएफएलच्या यादीत सिकची 389 व्या क्रमांकावर आहे. 




पद्माकर मुळे 


पद्माकर मुळे यांची अजित सीड्स ही कंपनी कृषी क्षेत्रातील उत्पादन करते. त्यांची संपत्ती 1 हजार कोटींच्या घरात आहे. तर पद्माकर मुळे हे पाच दशकांपासून बांधकाम आणि कृषी संशोधन उद्योगांत आहेत. तसेच 1986 पासून बियाणे, संशोधन, उत्पादनांत त्यांची अजित सीड्स ही कंपनी कार्यरत आहे.


पुन्हा औरंगाबाद चर्चेत...


यापूर्वी एकाच वेळी 100 मर्सिडीज खरेदी केल्यानंतर औरंगाबादची चर्चा जगभरात झाली. त्यानंतर अशाच इलेक्ट्रिकल गाड्या देखील उद्योजकांनी खरेदी करून औरंगाबादचा नावलौकिक वाढवला. त्यात आता अब्जाधीशांच्या यादीमध्ये औरंगाबादच्या सहा उद्योजकांचा समावेश झाल्याने औरंगाबादच्या उद्योग वाढीला याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.