सांगली : तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडेच्या माया मंडप डेकोरेटर्समधील  लोखंडी खुर्ची चक्क लंडन मधील मँचेस्टरच्या एका रेस्टॉरंट बाहेर आढळलीय. याहून विशेष बाब म्हणजे, ही 13 किलो वजनाची इतकी जड खुर्ची बाळू लोखंडे यांनी पंधरा वर्षापूर्वी भंगारमध्ये विकली होती. आता या पंधरा वर्षांमध्ये ही लोखंडी खुर्ची थेट लंडनमध्ये पोहचल्याने बाळू लोखंडेना आश्चर्याचा धक्का बसलाय. सांगलीची ही खुर्ची जी लंडनमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर असलेली पाहून सोशल मीडियामध्ये या खुर्चीची चर्चा सुरू झालीय.




क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने या सगळ्या खुर्चीचा सांगली टू लंडन प्रवास समोर आलाय. मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या अवस्थेत ही खुर्ची दिसत असून लेले यांनी नेमका हाच व्हिडीओ शूट करत शेअर केलाय. बाळू लोखंडे यांच्या खुर्चीचा शोध घेत सुनंदन लेले यांनी आज सावळज मधील बाळू लोखंडे यांच्याशी फोन वरून चर्चा करत त्या खुर्ची बद्दल माहितीही घेतली.  






व्हिडीओ पहा..



बाळू लोखंडे यांचा मागील काही वर्षापासून तासगाव तालुक्यातील सावळज भागात माया मंडप डेकोरेटर्स या नावाने मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. हे व्यावसायिक आपल्या मंडप डेकोरेटर्स मधील सर्व वस्तूंवर नावे टाकत असतात. बाळू लोखंडे यांनीही आपल्या सर्व वस्तूवर नाव टाकले ज्यात त्यावेळी या लोखंडी खुर्चीचा देखील समावेश होता. मात्र, या लोखंडी खुर्ची 13 किलो इतक्या वजनाच्या असल्याने पंधरा एक वर्षापूर्वी लोखंडे यांनी या लोखंडी खुर्ची भंगारमध्ये विकून  प्लास्टिकच्या खुर्च्या घेतल्या. मात्र, या लोखंडी खुर्ची मधील एक खुर्ची चक्क मँचेस्टरपर्यंत कशा पोहोचल्या याचे नवलच आहे. बाळू लोखंडे यांनी 15 वर्षांपूर्वी भंगारात विकलेली खुर्ची मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर सुस्थितीत असल्याचं पाहून त्यांना समाधान वाटल्याची भावना व्यक्त केलीय. या खुर्चीमुळे मला माझ्या जुन्या व्यवसायातील साहित्याची आठवण आली असे बाळू लोखंडे यांनी म्हटलंय.




सोशल मीडियावर सक्रीय असलेले सुनंदन लेले..
क्रिकेट समालोचक सुनंदन लेले हे फक्त क्रिकेटच नाही तर इतर गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. ते सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. क्रिकेट समीक्षण करण्याव्यतिरिक्त त्यांना फिरण्याची आणि खाण्याची प्रचंड हौस आहे. याचेच व्हिडीओ आणि माहिती असलेले व्हिडीओ सुनंदन लेले सोशल मीडियावर शेअर करत असतात. यात विदेशात फिरत असताना तिकडच्या गोष्टी, खाणपाण, नवीन वस्तू यांची माहिती ते देत असतात. अशीच एक खुर्ची त्यांच्या नद्रेस पडली. त्यावर मराठी नाव असल्याने त्यांनी कुतूहलाने त्याचा व्हिडीओ शेअर करत लंडनमध्ये बाळू लोखंडे यांची खुर्ची असल्याचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.