Medha Kulkarni Demands Pune Railway Station : पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळतोय. थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर आता अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
पुणे रेल्वे स्थानक नामांतर वादात 'पोस्टर वॉर'
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता शहरात 'पोस्टर वॉर' सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले. या बॅनरमध्ये 'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!' असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आले असल्याची माहिती आहे. बॅनरमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापले.
मात्र दुसरीकडे, पुणे स्टेशनच्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागलेल्या एका पाटीने आता लक्ष वेधून घेतले. लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांच्या सन्मानार्थ लावलेली पाटी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लेफ्टनंट कर्नल तारापोर यांना भारत पाकिस्तानच्या 1965 च्या युद्धात वीरमरण आलं आणि त्यांच्या स्मरणार्थ ही पाटी पुणे स्टेशनला लावण्यात आली आहे. एकीकडे पुणे स्टेशनच्या नावावरून राजकारण रंगताना दिसतंय तर दुसरीकडे भारतासाठी वीरमरण पत्करलेल्या या नावांचाही विचार करणे गरजेचं दिसत आहे.
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे काय म्हणाले?
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यावर म्हटले की, पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे आणि आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती. मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. परागंदा झालेल्या लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याची काम राजमाता जिजाऊ यांनी केले यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने पुणे रेल्वे स्टेशन ओळखले गेले पाहिजे.
महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव द्यावे - सचिन खरात
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचे समजत आहे. परंतु या नावाला आमचा विरोध आहे. रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली, आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू यांमध्ये आहे. तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला, त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशन ला देण्यात यावे, असे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात म्हटले.