मुंबई: येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत करण्यात आली आहे. त्यांना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान भोसलेंना त्यांच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रीमांडला विरोध केला. भोसलेंच्या रीमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 30 मे रोजी सकाळी अविनाश भोसलेंना सकाळी 11 वाजता पुन्हा कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना आज विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं गेलं होतं. भोसले हे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे जवळचे सहकारी असल्याचं सांगितलं जातं. अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (26 मे) सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली होती.
अविनाश भोसलेंच्या वकिलांचा युक्तीवाद
या प्रकरणी तपासयंत्रणेनं आरोपपत्र दाखल झालंय, आरोप निश्चित झालेत. त्यामुळे आता नव्यानं यात कुणालाही अटक करता येणार नाही. या प्रकरणाच्या चौकशीत नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार ही अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की, यात अनेक माहिती नसलेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे या कारवाईला आव्हान देता येणार नाही. हायकोर्टानं या खटल्याला 13 जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयानं यावर पुढील सुनावणी 20 जूनला घेण्याचं निश्चित केलंय. तोपर्यंत यात नव्यानं रिमांडही घेता येणार नाही.
30 एप्रिल रोजी अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.
अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?
- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.