मुंबई : कोरोनाच्या तिन्ही लाटा ओसरल्यानंतर निर्बंधमुक्त ,मास्क मुक्त राज्य झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मागील आठवड्याभरापासून वाढायला सुरवात झाली आहे. मृत्युदर, रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असले तरी ही रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी वेळीच खबरदारी घेण्याचा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. ही रुग्णसंख्या कशाप्रकारे वाढत आहे? कशी खबरदारी घ्यावी? पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यामागचं कारण काय?
फेब्रुवारी-मार्च महिन्यात आपण कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आणि 2 एप्रिलपासून मास्क ऐच्छिक केला. शिवाय, राज्यभरात लावलेले निर्बंध सुद्धा बऱ्यापैकी पूर्णपणे शिथिल केले आहेत. मात्र पुन्हा एकदा आता कोरोना डोकं वर काढू लागला आहे. याचं कारण म्हणजे मागील आठवडाभरापासून होणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची वाढ.
आता ही रुग्णसंख्या नेमकी कशी वाढते यावर नजर टाकूया
कोरोना रुग्णांची राज्यात वाढलेली संख्या रोज नव्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या22 मे - 326 नवे कोरोना रुग्ण23 मे - 208 नवे कोरोना रुग्ण24 मे - 338 नवे कोरोना रुग्ण25 मे - 334 नवे कोरोना रुग्ण26 मे - 551 नवे कोरोना रुग्ण
कोरोना रुग्णांची मुंबईत वाढलेली संख्यारोज वाढणारे नवे कोरोनाबाधित रुग्ण23 मे रोजी 150 नवे रुग्ण24 मे रोजी 218 नवे रुग्ण25 मे रोजी 295 नवे रुग्ण 26 मे रोजी 350 नवे रुग्ण
राज्याचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 1.59 टक्के आहे. तर मुंबई, पुण्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळत आहे. ही वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री त्यासोबतच राज्य शासनाकडून केलं जात आहे.
कोरोना पूर्णपणे गेलेला नाही कोरोनाचे नवे स्ट्रेन येतच राहणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही वाढती रुग्ण संख्या काही प्रमाणात चिंतेचं कारण जरी असलं तरी घाबरुन न जाता आपली योग्य ती खबरदारी घ्या, गर्दीत किंवा गरज असेल तिथे मास्क वापरा, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा हेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.