Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर (Navale Bridge) अपघात सत्र सुरूच आहे. आज रात्रीच्या सुमारास नवले पुलावर भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये 24 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. सहा जण या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे.

  या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे.  या अपघातात एकूण 24 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे. 


सातारहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रकवरचे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला.  या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतुक बराच वेळ थांबवावी लागली.  पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि  वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भागा अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.


मुख्यमंत्र्यांकडून दखल


नवले ब्रिजवर टँकरच्या धडकेने झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचे तसेच यातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


नवले पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी


नवले पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते.  नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होतोना दिसत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. होमहवन, प्रेतयात्रा अशी प्रतिकात्मक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आला होता. नवले पुल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पुल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता.  या ठिकाणी अपघातांमधे सतत होणारी जिवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.


ही बातमी देखील वाचा


Navale Bridge Accident: अपघाताचं सत्र कधी थांबणार! सिमेंट मिक्सर गाडीवर पलटी झाल्याने नवले पुलावर मोठा अपघात; दोघे जखमी तर गाडीचं मोठं नुकसान