Rahul Gandhi In Maharashtra Aurangabad: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) राज्यातील आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. उद्या राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. 'राहुल गांधी उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे.
असा असणार राहुल गांधींचा दौरा...
उद्या सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.
14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली ही यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन आज प्रदेशमध्ये पोहोचत आहे.
आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहचली. निमखेडी फाटा येथे युनिटी ऑफ लाईट हा एक छोटेखानी कार्यक्रम सायंकाळी 6. 30 वाजता होईल. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर पदयात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे.
राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका
राहुल गांधी आज दुपारी आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात बोलताना म्हणाले की, आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजप करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले. आज दुपारी जळगाव जामोद मध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच आहेत.
ही बातमी देखील वाचा