नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी, श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलं.


यासाठी आज विधानसभेत विशेष हक्कभंग मांडण्यात आला. त्याला सर्व पक्षीयांना पाठिंबा दिल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचे आदेश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला.

“महाराष्ट्रातल्या आमदारांची खिल्ली उडवली जाते. श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भिमराव नलगे या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत धिंगाणा केला. छगन भुजबळ यांच्याबाबत संबंध नसताना शिवीगाळ केली. श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. त्यांना निलंबित करा. अधिकाऱ्यांना कडक संदेश गेला पाहिजे. अधिकारी मुजोर झाले आहेत. ते एकाही आमदाराला विचारत नाहीत”, असं आव्हाड म्हणाले.

महावीर जाधव यांच्याविरोधात आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करत आहोत तो हक्कभंग समिती पुढे न्यावा,  असं आव्हाडांनी नमूद केलं.

विशेष हक्कभंग

महावीर जाधव,पोलीस उपनिरीक्षक निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही केली.

सभागृहाची भूमिका सत्ताधारी की विरोधक असा प्रश्न नाही. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही. प्रत्येक घटनेच्या वेळी सभागृह आमदारांच्या मागे उभं राहतं. जे अधिकारी मुजोर झालेत अशा लोकांना शासन करण्याची गरज आहे.

सचिव आता मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झालेत. ते असे बोलतात, जसे राज्य सचिवच चालवतात.

आमदार निवडून जातात, लोकांची कामं करतात. पदोपदी अवमान होतो हे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे मुजोर अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी विखे पाटली यांनी केली.

सुनील प्रभू

पोलीसावर कारवाई व्हावी. महिलांवर हात टाकला हा माज आहे. भुजबळांचा अपमान केला. बच्चू कडूंविरोधात सगळं मंत्रालय एकत्र आले. आमदार अपमान झाला तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे, आपलं संरक्षण कोण करणार? कोणत्याही आमदारांचा अपमान होत असेल तर तात्काळ निलंबित करा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली.

भुजबळांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा, असं म्हणत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विशेष हक्कभंग प्रस्तावाला पाठिंबा दिला.

एकनाथ खडसे

अधिकाऱ्याने नियमाने काम करावे. लोकप्रतिनिधी गेल्यावर उचित सन्मान केला पाहिजे. ज्येष्ठ सदस्याचा अवमान करत असेल तर जबाबदारी आपली. भुजबळ ज्येष्ठ आहेत, मंत्रिपदं भूषवली आहेत. शिवराळ भाषेत बोलत असेल तर आधी निलंबित करा, मग कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली.

राजेश क्षीरसागर, शिवसेना आमदार, कोल्हापूर

IPS ज्योतिप्रिया सिंह यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी राजीनामा देईन, असा इशारा त्यांनी दिला.

भुजबळांना न्याय दिला, आम्ही काय घोड मारलं, सहा वर्षे आम्हाला न्याय मिळत नाही.  न्याय मिळत नसेल तर सभागृहात येण्याची इच्छा नाही, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.

हे प्रकरण हक्कभंग समितीत आहे. तेव्हा साक्षीदाराला धमकी दिली होती. ज्योतिप्रिया सिंह यांनी या समितीचाही हक्कभंग केला, असा आऱोप त्यांनी केला.