मुंबई : अवघ्या काही दिवसांवरच पावसाळा ऋतू येऊन ठेपला आहे. त्यामुळं येऊ घातलेल्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय राखत अतिशय काळजीपूर्वक काम करावे, सोबतच नागरिकांना वेळीच सुचना मिळतील याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. रविवारी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेताना ते बोलत होते. 


सदर आढावा बैठकीला कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मस्त्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती प्रशासनाला दिली. आपत्ती व्यवस्थापनासोबतच दरम्यानच्या काळात मासेमारी व्यावसायिक बोटींशी संपर्क ठेवत त्यांनाही सूचना पोहोचवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे  नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याबाबतची काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. 


मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची लूट; तीन डॉक्टरांना बेड्या 


तिवरेसारखी दुर्घटना घडू नये म्हणून सावध व्हा
तिवरे धरणाच्या दुर्घटनेचा पुनरच्चार करत सबंधित सर्व यंत्रणांनी देखील मातीच्या धरणांची देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील सावध करावे आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या काळात पालघर मध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरु झाली होती हे पाहता तेथील यंत्रणेनेही सावध राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.     


महानिर्मितीची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची संकल्पना


प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु झाले असून ते २४ तास सुरु राहणार असल्याचं सांगत जीवरक्षक बोटी, जॅकेट आणि इतर सामग्री उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात ठेवण्यासाठी विनंती केली असून त्यांचे मॉक ड्रीलही झाल्याचं म्हणत निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसची नुकसान भरपाई १०० टक्के दिल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. 


चार ठिकाणी नवीन रडार
हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाउस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण २०१७ पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मेमध्ये जास्त असतो असे सांगून होसाळीकर यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे शक्य झाल्याची माहिती दिली.