रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला. पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला. या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत प्रकल्प रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यता येत आहेत. विविध संघटना आणि राजापूरमधील प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते.


रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी आणि राजापूर बाजारपेठ बंदची हाक व्यापारी संघटनेनी दिली होती. प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळी 11 वाजता मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चकऱ्यांनी ऑईल रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत यावा, असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.


शिवसेनेपासून सर्वत पक्षांच्या नेत्यांना आपण या संदर्भात विनंती करणार असल्याचं कोकण विकास समितीकडून सांगण्यात आलं. नाणार ऑईल रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावातून सुद्धा अनेक प्रकल्पग्रस्तांनी या मोर्चाला हजेरी लावली. हजारो कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प असल्याने यातून रत्नागिरीचा विकास आणि रोजगार मिळणार असल्याने हा प्रकल्प हवा अशी भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्यांनी मांडली.


नाणार प्रकल्पाला शिवसेनेने स्थानिकांच्या विरोधामुळे विरोध केला होता. शिवसेना आणि भाजपची लोकसभेत युती होण्यासाठी रिफायनरी रद्दची अट शिवसेनेने घातली होती. प्रकल्प रद्द झाल्यानंतर शिवसेना-भाजप युती झाली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी प्रकल्पाच्या बाजूनी असल्याने या मोर्चाला भाजपने समर्थन दिलं होतं. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता प्रकल्प पुन्हा रत्नागिरी येण्यासाठी समर्थकांनी कंबर कसली आहे.