सोलापूर : मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या शहरात सुरू असलेल्या 'ओला बाईक्स'च्या बिजनेसला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे  मोटर सायकलवरून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मोटरसायकल चालक-मालकांवर सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या कारवाईनंतर मागील 3 महिन्यापासून सोलापूरात सुरू असलेली ओला बाईक सेवा बंद झाली आहे.


अॅपद्वारे बुकिंग केल्यानंतर प्रवासी वाहतुकीची सेवा ओलातर्फे देण्यात येते. त्याच धर्तीवर 'ओला'ने सोलापुरात नुकतीच 'ओला बाईक'ची सुरूवात केली होती. 'ओला'ची दुचाकी सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांचाही प्रतिसाद मिळत होता. नागरिकांना जरी ही सेवा सोयीस्कर वाटत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच मोटार वाहन अधिनियमानुसार खासगी वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करणे चुकीचे असल्याने ओलावर कारवाई करण्यात आली.

सोलापूर शहरात ओला कंपनीच्या ॲपवरून खाजगी मोटरसायकलस्वार बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी भरारी पथकाला आदेश देऊन शहरात आणि परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटरसायकल चालक-मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

या भरारी पथकाने सुरुवातीला सापळा रचत ओला अॅप वरून दुचाकी बुक केली आणि त्यानंतर त्यास परिवहन विभागाच्या ऑफिसपर्यंत नेण्यात आले. प्रवासानंतर रीतसर मेसेजही आला आणि प्रवासाचे पैसे दिल्यानंतर त्यास पथकाने कागदोपत्रांची मागणी केली. मात्र वाहन चालकाकडे प्रवासी वाहतुकीचे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आल्याने मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि  मोटरसायकल चालक विशाल यादव व मालक विश्वास यादव या दोघांविरुध्द कारवाई केली.

मोटर वाहन निरीक्षक अशोक केवट, महेश रायबान, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नानासाहेब शिंदे यांच्या पथकाने सोलापुरात 300 ओला बाईक सुरू असल्यासाची माहिती दिली आहे. त्यातले अनेक बाईक चालक हे बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.