पंढरपूर : आषाढी यात्राकाळात देशभरातून आलेल्या विठ्ठलभक्तांनी विठुरायाचरणी दिलेल्या भरभरुन दानामुळे तिजोरी भरुन वाहू लागली आहे. आत्तापर्यंत चार कोटी 40 लाखांचं विक्रमी उत्पन्न देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे.

यंदा आषाढीला जवळपास 14 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. गेल्या चार दिवसांपासून देवाच्या दक्षिणा पेट्या फोडून त्याची मोजणीचे काम सुरु होते. या वर्षी भारतीय चलनासोबत अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, नेपाळ, युक्रेन अशा विविध देशातील परकीय चलन मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचे समोर आले आहे. यात विविध देशांच्या नोटांसोबत नाणीदेखील सापडली आहेत.

देवाच्या दर्शनाला दरवर्षी परदेशी भाविकांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने यातील काही मंडळींनी हे परकीय चलन देवाच्या तिजोरीत जमा केले असण्याची शक्यता आहे. परदेशातील भाविक परकीय चलन टाकत असताना काही सोन्या-चांदीच्या वस्तूदेखील दक्षिण पेटीत आढळून आल्या आहेत.

एकीकडे भाविक मोठ्या प्रमाणात रक्कम दान पेटीत टाकत असताना काही ठकसेन भाविकांनी जुन्या, बंद झालेल्या पाचशेच्या नोटा आणि नवीन चलनातील काही बोगस नोटादेखील देवाला अर्पण केल्याचे मोजणीतून समोर आले आहे .

दिवसाला मिळालेले प्रमुख उत्पन्न 

1 विठुरायाच्या पायावर 40 लाख रुपये

2 रुक्मिणी मातेच्या पायावर 7 लाख 72 हजार रुपये

3 देणगीद्वारे जमा 1 कोटी 84 लाख रुपये

4 लाडू प्रसाद 68 लाख रुपये

5 भक्त निवास 20 लाख 50 हजार

6 हुंडी पेटी 1 कोटी 5 लाख रुपये