वर्धा : वर्ध्यात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपणीला भेट आज भेट दिली. गडकरी यांनी पाहणी करत याबाबत आढावा घेतला. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालं आहे हा आनंदाचा विषय आहे. अनेक रुग्ण या औषधाकरता तडफडत असल्याने लोकांमध्ये अस्वस्थतेचा अनुभव आला आहे. देशात जेनेटिकला पहिली परवानगी मिळाली आहे.
याच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात याचे वितरण विदर्भाचे सर्व जिल्हे, नागपूर शहरात प्रथम करु, महाराष्ट्रात इतर ठिकाणी होईल. यात वर्ध्याला प्राथमिकता मिळेल, असं गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार हे इंजेक्शन मिळेल. आता ब्लॅक मार्केटिंग होणार नाही. अनेक लोकांच्या सहकार्याने हे शक्य झालं आहे. मी डोळ्यानं उत्पादन बघितलं आहे. या औषध निर्मितीमुळं गोरगरीब लोकांच्या प्राणाचे रक्षण होईल. हे कठीण काम होतं पण यशस्वी झालो, असं ते म्हणाले.
तिसरी लाट येण्याची शक्यता
गडकरी म्हणाले की, वर्ध्यामध्ये भिलाईवरून ऑक्सिजन आणण्यात येणार आहे . सेवाग्राम, सावंगी रुग्णालयाला 20 टन ऑक्सिजन मिळणार आहे. व्हेंटिलेटर द्यायला तयार आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. सर्वांनी हिमतीने याचा प्रतिकार केला पाहिजे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. हे संकट मोठं आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेता यावेळच्या अडचणी लक्षात घेउन तयारी असायला पाहिजे, असं ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, एकाचाही ऑक्सिजनविना, औषधाविना मृत्यू होता कामा नये याची दखल घेण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी, मास्क लावावा, सॅनिटायझर वापरावं, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.