लातूर : कोरोना काळातील स्मशानशांतता, रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आणि रुग्ण, नातेवाईकांची होत असलेली हेळसांड... या संबंध स्थितीचे वर्णन रोज समाजात आणि सोशल मीडियात होतच असते. पण दातृत्व करणारे बोटावर मोजण्याऐवढेच असतात. याचा प्रत्यय लातुरात येत आहे. 10 तरुणांनी सुरु केलेल्या कामाला आता चळवळीचे स्वरूप येत आहे. रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना थेट मदतीचा हात मिळत असल्याने वेळेत उपचार होत आहेत. 10 तरुणांनी मिळून घेतलेला निर्णय आज अनेकांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. 


जगातील सर्वश्रेष्ठ दान, महादान हे भुकेलेल्यांना अन्नदान करणं. संकट काळात अडकलेल्या, आपत्तीत सापडलेल्यांना शक्य ती मदत करणं. ही मदत करण्यासाठी फक्त इच्छा असावी लागते. याच विचारातून लातुरच्या 10 तरुणांनी एकत्र येत काम करूयात असा विचार मांडला. तत्काळ अंमलबजावणी सुरु केली. यात पत्रकार, पगार नसलेले अतिरिक्त शिक्षक, मार्केट यार्डमध्ये हमाल असलेले तरुण, विविध कार्यक्रमात फेटे बांधण्याचे काम करून आपलं पोट भरणाऱ्या व्यक्ती, स्कूल बस चालक अशी 10 लोक एकत्र जमली आणि कामं वाटून घेण्यात आली. 


या तरुणांना समाजातील काही लोकांनीही पुढाकार घेऊन मदत केली. साहित्य जमवलं. तांदूळ, भाज्या, तेल, मसाला या साहित्यासह स्वयंपाक करण्याची जबाबदारी यातील हॉटेल चालकाने घेतली. सामान बाजारातून निर्धारिती स्थळी घेवून येणं, भाज्या चिरणं, खिचडी, पुरी भाजी, उपमा असे पदार्थ बनवण्यात येत आहे. या तरुणांच्या पुढाकारानं दररोज तिनशे पेक्षा जास्त फूड पॅकेट तयार केले जातात. शहरातील खासगी हॉस्पिटल, सरकारी दवाखान्यांसमोर उभे असणारे रुग्णांचे नातेवाईक यांना या फूड पॅकेडट्सचे वाटप केले जातात. गेल्या 10 दिवसांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.


दिवसभर तयारी आणि सांध्यकाळी वाटप. हा या तरुणांचा दिनक्रमच बनला आहे. यासोबतच रुग्णांसाठी बेड्स, आर्थिक मदत आणि इतर समस्या ओघाने आल्याचं. जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत हे तरुण करतात. यापैकी एकाही तरुणाने आपला फोटो फेसबुकवर शेअर केला नाही. तसेच एबीपी माझाने त्यांच्या कामाची दखल घेण्याचं ठरवलं तर त्यावेळीही या दानशूरांनी आपलं नाव न लिहिण्याची विनंती केली. या तरुणांपैकी एकाचीही परिस्थिती फारशी भक्कम नाही. या तरुणांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही किंवा मोठ्या व्यक्तीचं पाठबळही नाही. केवळ आपणही समाजाचे काही देणे लागतो या विचाराने हे तरुण एकत्र आलेत आणि गरजूंना मदत करतात. मदत करताना घराची जबाबदारीही ते उत्तमपणे सांभाळतात. या तरुणांच्या माणुसकीला आणि त्यांच्या कामाला एबीपी माझाचा सलाम!