कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी. कोरोनाशी सामना करत असताना शाहू महाराजांच्या आपत्ती व्यवस्थापन तंत्राची आज आठवण येतेय. साधारण 120 वर्षांपूर्वी वैद्यकीय सुविधा नसतानाही शाहू महाराजांनी प्लेगच्या साथीचा सामना केला होता.


कोरोनानं देशात आणि जगात जी परिस्थिती करुन ठेवलीय तशाच पद्धतीचं संकट 1898-99 साली आलं होतं. आणि ती होती प्लेगची साथ. पटापटा नागरिकांचे जीव जात होते. पण अशा वेळी करवीर संस्थानात प्लेगचा फारसा शिरकाव झाला नाही. त्याचं कारण होतं राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेलं व्यवस्थापन. आज जे आपण क्वॉरंटाईन किंवा विलगीकरण म्हणतो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाहू महाराजांनी 120 वर्षांपूर्वी केली होती. कोल्हापूर शहराला महाराजांनी जवळपास रिकामं केलं होतं. ग्रामीण भागातील नागरिकांना शेतात झोपट्या बांधून राहण्यास मदत केली. देशातील पहिलं प्लेगचं हॉस्पिटल याच कोल्हापुरात उभं राहिलं होतं.


महाराजांनी प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी केवळ प्रजेला कामाला लावलं नाही, तर स्वत: सगळ्या नियोजनावर लक्ष ठेवून होते. त्यावेळी शाहू महाराज पन्हाळागडावर वास्तव्यास राहून करवीर संस्थानातील प्रजेला प्लेगच्या साथीपासून वाचवत होते. त्यावेळी अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे नागरिकांना वैज्ञानिक माहिती देणं सोपं नव्हतं. कोरोना बाबतीत झालं तसंच त्यावेळी सुद्धा प्लेगच्या लसीबाबत झालं. पण शाहू महाराजांनी पहिल्यांदा स्वत: लस टोचून घेतली.


करवीर संस्थानात त्यावेळची सर्वात मोठी यात्रा जोतिबाची असायची. मात्र ती यात्रा शाहू महाराजांनी रद्द केली होती. आता देखील तशाच पद्धतीनं सण, उत्सव, यात्रांवर बंदी घातली गेलीय. अशा साथींच्या वेळी राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी कशी घ्यायची याचा आदर्शच शाहू महाराजांनी समोर ठेवला आहे. त्या पद्धतीनंच नियोजन करत कोरोनाला हरवणं आताच्या घडीला महत्वाचं बनलंय. 


महत्वाच्या बातम्या :