मुंबई : महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकार असून त्यांनी अगणित भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी केला. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये रत्नागिरीच्या स्टेशनचे छत उद्घाटनाच्या आधीच कोसळल्याचा दावा केला. मुंबई-नाशिक महामार्ग सुरू व्हायच्या आधीच त्यावर शेकडो खड्डे पडले, सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्येही राज्य सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.
प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यात विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरू आहे, कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेल्याचंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राची जनता हिशोब करणार?
राज्यात खोके आणि धोके सरकार असल्याचा आरोप करत प्रियंका गांधी यांनी महायुती सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे महायुतीच्या सरकारने जनतेची फसवणूक केली असून राज्यातली जनता याचा लवकरच हिशोब करणार असा इशाराही त्यांनी दिला.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्ग, जो अद्याप पूर्णत: तयारही झाला नव्हता, त्यावर 500 हून अधिक खड्डे आणि भेगा पडल्या आहेत.
यापूर्वी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत.
महाराष्ट्रात ‘खोके आणि धोके’ सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशोब करणार.
ही बातमी वाचा: