पुणे : भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा पक्षप्रवेश शरद पवारांसाठी डोकेदु:खी ठरण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीतील इंदापूरच्या काही नेत्यांनी स्पष्ट विरोध केला असून आता इंदापूरमध्ये ज्याजागी शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्याच जागेवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP) प्रवेशानंतर प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा हे नाराज झाले असून या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका स्पष्ट केली. तसेच, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान उभं केलं असून इंदापुरात तिसरा पर्याय देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे, या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येते. 


पक्षात मी आणि आप्पासाहेब जगदाळेंसह अनेकजण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक होतो. याबाबत, आम्ही साहेबांना देखील सांगितले होते की जे पक्षात आहेत त्यांना उमेदवारी द्या. मात्र, आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे, तिसरी आघाडी पर्याय द्यावा अशी कार्यकत्यांची मागणी आहे. लोकांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, त्यामुळे आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार असल्याचं पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे.  विशेष म्हणजे प्रवीण माने यांनी कार्यकर्त्यांसह 11 तारखेला मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला, तिथेच 11 ऑक्टोबर रोजी मेळावा होईल, असेही माने यांनी सांगितले. 


आता जनतेच्या कोर्टात आमचा चेंडू


मीच उमेदवार म्हणून हे सगळं चाललं होतं, अन्याय किती असावा? 2014 ला मला असेच आश्वासन दिले होते. 2019 ला आम्ही निर्णय घेतला, आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांनी मला मोहिते पाटील यांच्या घरी बोलावून शब्द दिला आणि सांगितले होते की 2024 ला तुम्हीच. त्यामुळे, आता जनता हसायला लागली आहे. माझ्यावर आणि प्रवीण मानेवर अन्याय झाला आहे. आता, आम्ही 11 तारखेला मेळावा घेऊ,  लोकांच्या कोर्टात चेंडू टाकू, असे आप्पासाहेब जगदाळे यांनी म्हटले. तसेच, आम्ही लोकसभेला काम केलं, आता लोकांना विचारून काम करू. आज लोकं म्हणतात आजी नको, माजी नको तरी पण त्यांनाच बोलावून घेतात. आजपर्यंत कधी कुणाकडून रुपया घेतला नाही तरी माझ्यावर अन्याय का? किती दिवस अन्याय सहन करायचा?


आम्ही पक्ष सोडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार नाही, ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना दिली तरच आम्ही काम करू, आत्ता देण्यात आलेली उमेदवारी कॅन्सल करावी लागेल, नाहीतर उद्रेक होईल. याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये भोगावे लागतील, अशा शब्दात जगदाळे यांनी थेट शरद पवारांनाच इशारा दिला आहे. माझं मन रडत आहे, अदृश्य शक्तीने जर काम केलं असेल तर ही बेईमानी आहे, अस केलं असेल तर योग्य नाही, असेही जगदाळे यांनी म्हटले. 


वेगळा विचार करावा लागेल - शहा


मी कार्यक्रमाला येणार नव्हतोच, मी ताईंना आधीच सांगितले होतं, ताईंना सदिच्छा भेट दिली. आम्हाला वेगळा पर्याय शोधायाचा होता, पण तोच पर्याय पुढं आल्याने आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे भरत शहा यांनी म्हटलं.