मुंबई: 'नोटाबंदीमुळे काळ्या पैशाचे पांढरे करण्यास उलट मदतच झाली. जो पैसा बँकेत आला तो पांढरा झाला, मग काळा पैसा गेला कुठे? त्यामुळे नोटाबंदीचा जो काही उद्देश होता तो अजिबात सफल झालेला नाही. किंबहुना नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठी पळवाट त्यामध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकाला अडीच लाख जमा करण्याची मुभा दिली हिच मोठी त्या निर्णयामागील पळवाट होती.' अशी थेट टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एबीपी माझाच्या नोटबंदीचे ५० दिवस या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट

'ज्या उद्देशाने नोटाबंदी केली, तो उद्देश अजिबात सफल झाला नाही. भारतात 98% रोखीने व्यवहार चालतात. त्यामुळे पूर्वतयारी नसतानाही नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला काँग्रेसनं कधीही विरोध केला नाही. निर्णय योग्य आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची होती. काळा पैसा हातात आला कुठे? नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट ठेवली. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकी अडीच लाख जमा करण्याची मुभा का देण्यात आली? त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी आपल्या जवळच्या लोकांमध्ये ती रक्कम वाटून बँकेत पैसे जमा केले. आणि हिच मोठी पळवाट या निर्णयामध्ये होती.' असा आरोप चव्हाणांनी केला.

नोटाबंदीचा नागरिकांना प्रचंड त्रास

'500 रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापायला हव्या होत्या. पण हे सरकार ते करण्यात कमी पडलं. नोटा तयार ठेवायला पाहिजे होत्या. पण ते काहीही त्यांना जमलं नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. अजूनही लोकांना खरी परिस्थिती माहित नाही. पण किती मोठी लोकं रांगेत उभे राहिलेलं पाहायला मिळाले. असं काहीही झालं नाही. मोठ्या लोकांनी तेच पैसे सोन्यात गुंतवले. इतर ठिकाणी गुतवंले. त्यामुळे आता जो पैसा बँकेत जमा झाला तो सगळा पांढरा पैसा आहे. त्यामुळे सरकारच्या हातात काहीच आलं नाही.' असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कॅशलेससाठी नोटाबंदीची गरज होती का?

'कॅशलेससाठी तुमच्याकडे पुरेशी तयारी नाही. ग्रामीण भागात कनेक्टिव्हीटी नाही. कॅशलेस करण्यासाठी नोटाबंदीची गरज होती का? नोटाबंदी हा निर्णय फक्त काळा पैसा काढण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय. पण त्या निर्णयाचा फार काही फायदा सरकारला झाला नाही. तसंच कॅशलेस झाल्यावर भ्रष्टाचार कमी होतो हा गैरसमज देखील करुन घेऊ नका.' असंही चव्हाण म्हणाले.

नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच


'नोटाबंदी करणं हे योग्य नव्हतं हे खुद्द रघुराम राजन यांनीही म्हटलं आहे. आणीबाणी निर्णयाबाबतीच इंदिरा गांधींनी मोठेपणानं माफी मागितली होती. या सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे मान्य करायला हवं. पण आता या सर्वात मार्ग काढणं गरजेचं आहे. मी मार्ग सुचवला होता. २००ची नोट काढा, २०००ची नोट बंद करावी हे आधीच सांगितलं आहे.' असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

VIDEO: