मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यापासून ते नागरिकही आता मंदिरं खुली करण्याची मागणी करु लागले आहेत. देशातील अनेक धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही मंदिरांना कुलूप असल्यानं आता मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिर्डीचे साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्यानं अर्थकारण जागेवर थांबलं असून साई मंदिर सुरू करण्याची मागणी वाढत असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा व साई मंदिर सुरू करावे अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई सोबत आता उपोषण करावे लागले असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 6 महिन्यात शिर्डीच एक हजार कोटींचे नुकसान झाले असून सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा साई संस्थानच्या माजी विश्वस्तांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र मागील 5 महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होतोय. तर मंदिर परिसरात राहणाऱ्या अनेकांचे उद्योग आणि व्यवसाय मंदिर बंद असल्याने ठप्प झाले आहेत. राज्यात सर्व काही सुरु होत असताना मंदिर देखील सुरु करण्यात यावी अशी मागणी भाविक करत आहेत. तिरुपती बालाजी मंदिराच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी भाविक करत आहेत.
राज्यातील मंदिरं तातडीनं सुरू करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी सनातनी वारकरी संप्रदयासोबत आंदोलनात उतरणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेने 1 लाख वरकाऱ्यांसामावेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.
महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल