मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम सण-उत्सवांवरही झाल्याचं दिसून येत आहे. एवढचं नाहीतर लॉकडाऊन लागू झाल्यापासूनच राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं बंद आहेत. लॉकडाऊननंतर सध्या देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु, अद्याप राज्यभरातील धार्मिक स्थळं बंदच आहेत. यामुळे पुजारी आणि मंदिराच्या भोवतालचे व्यावसायिक नाराज आहे. अद्यापही राज्य सरकारने मंदिरं सुरु करण्याबाबत निर्णय न
दिल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी पुजाऱ्यांनी भेट घेतली.
जर महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकता, तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातली मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे.
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मंदिरं का नाही? परंतू एकत्र झुंबड आली तर काय करायचं? : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांशी बोलताना सांगितले की, 'तुम्ही कशाप्रकारे मंदिरं सुरु करणार? याची नियमावली तयार करा. मंदिरात अचानक झुंबड आली तर काय करणार? यासंदर्भात नियमावली तयार करा. ही नियमावली आपण राज्य सरकारकडे सुपूर्द करू, अशी सुचना राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना दिली. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मंदिरं खुली करण्यात यावी, असं आपलंही मत आहे, पण इतर धर्मियांचं काय? ते सर्व नियम पाळणार का? ही शंकाही त्यांनी या बैठकीदरम्यान उपस्थित केली आहे.
'महाराष्ट्रातील मॉल उघडले असतील तर मग मंदिरं का नाही?' असा प्रश्नही राज्य सरकारला राज ठाकरे यांनी विचारला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'नियमावली आली तर ती सर्वांसाठी असेल. मंदिरं उघडण्यात यावी ही मनसेची भूमिका आहेच, पण जर लोकांची झुंबड आली तर ती कशी नियंत्रणात आणणार? हा प्रश्नही आहेच. मंदिरे खुली झाली आणि गर्दी झाली तर नियोजन कसं करणार? धार्मिक स्थळं उघडली तर त्यात फक्त मंदिरं नसतील तर इतर धार्मिक स्थळंही असतील. आपण सर्व नियम पाळले पण इतरांनी नाही पाळले तर काय करणार? त्यामुळे राज्य सरकारने याबाबत नियमावली तयार करायला हवी, अशी मागणी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं होतं. 'मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील', असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :