नवी दिल्ली : सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 3 नेत्यांचाही समावेश होता. या पत्रातून संघटनेच्या हिताचेच मुद्दे उपस्थित झाले असले तरी त्याच्या टायमिंगबद्दल काल काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केले गेले. शिवाय तूर्तास वादळ शांत झालेलं असलं तरी या पत्राचा परिणाम या नेत्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर होऊ शकतो का हेही पाहणं महत्वाचं असेल.


काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत 7 तासांची वादळी चर्चा झाली आणि ज्या 23 नेत्यांनी पत्र लिहिलं, त्याबद्दल सोनिया गांधींनी भावना व्यक्त झाली. 6 महिन्यांत नव्या अध्यक्षाची निवड करायचंही ठरलं. तोपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार हेही स्पष्ट झालं. पण ज्या नेत्यांनी हे पत्र लिहिलं त्यांच्यासाठी सगळं काही समान राहणार आहे का? महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर या पत्र प्रकरणाचा काय परिणाम होणार?


पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरांचे वेगळे सूर गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहेतच. पण पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक अगदी कट्टर काँग्रेसी. हायकमांडशी त्यांचे अगदी उत्तम संबंध राहिले आहेत. पण बहुधा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी ते राहुल गांधी असं जे स्थित्यंतर होतंय, त्यात नव्या नेतृत्वाशी जुळवून घेणं त्यांना थोडसं जड जातंय. त्यामुळेच ही घुसमट पत्रातून व्यक्त झाली असावी.


पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का याची चर्चा होती. पण त्यांनी विधानसभा लढवली. पण नंतर ना ते मंत्री झाले, ना विधानसभा अध्यक्ष. आता राष्ट्रीय पातळीवर त्यांना काही जबाबदारी दिली जाणार याची चर्चा असतानाच हे पत्राचं प्रकरण समोर आलंय. त्यामुळे भविष्यात राहुल गांधी त्यांना किती विश्वासात घेतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


मुकुल वासनिक हे देखील सोनिया गांधी गटाचे अत्यंत महत्वाचे शिलेदार. संघटनेत अगदी महत्वाची जबाबदारी ते सांभाळत आलेत. पण सध्या राहुल गटाचे के सी वेणुगोपाल यांच्याकडेच संघटनेचा भार सर्वाधिक आहे. शिवाय राज्यसभा उमेदवारीच्या वेळी त्यांचं नाव चर्चेत होतं. पण शेवटच्या क्षणी राहुल गांधी गटातल्या राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मुकुल वासनिक यांना आता पुढच्या काळात संघटनेतलं आपलं वजन टिकवू शकणार का हा प्रश्न आहे.


मिलिंद देवरा यांच्याबाबतीत तर अनेक चर्चा सातत्यानं सुरु असतात. ज्योतिरादित्य, सचिन पायलट यांचं बंड यांच्यानंतर भाजपच्या बाजूला आणखी कोण कोण जाऊ शकतं. यात काही लोक मिलिंद देवरा यांचंही नाव घेतात. मिलिंद देवरा यांनी अद्याप थेट भाजपच्या बाजूनं कुठली कृती केली नसली तरी त्यांची मतं मांडताना ते मागेपुढे पाहत नाहीत. आता या पत्र प्रकरणामुळे या तीनही नेत्यांच्या राजकीय वाटचालीवर कसा परिणाम होते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.


संबंधित बातम्या