रायगड : 'देव तारी त्याला कोण मारी', याचा प्रत्यय रायगडमधील इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यादरम्यान आला. महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तब्बल 19 तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं. यावेळी सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
एनडीआरएफच्या जवानांना दोन पिलरमध्ये एक पाय हलताना दिसला. एका जवानांना पायाला अलगद स्पर्श करत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहम्मदनेही त्यांना प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच एनडीआरएफच्या जवानांनी तो पिलर कटरच्या साह्याने तोडून चिमुकल्या मोहम्मदला या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढले. तब्बल 18 ते 19 तास अंधारात, उपाशी आणि भीतीच्या छायेत राहिलेल्या मोहम्मदने बाहेर आल्यानंतर एक शब्द उच्चारला तो म्हणजे 'अम्मी आणि अब्बू'.
मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तब्बल 18 तास मोहम्मदने आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज दिली. शेवटी तो या संकटातून बाहेर पडला. मोहम्मदची आई आणि दोन बहिणींचा शोध सध्या एनडीआरएफचे जवान घेत आहेत. पण मोहम्मद या संकटातून बालंबाल बचावला.
दरम्यान, रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा एक आणि आज चार मृतदेह दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली 18 ते 19 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते. त्यापैकी 75 जण सुरक्षित असून अजूनही काही जण अडकले आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.