अकोला : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मंदिर प्रवेशावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी 31 ऑगस्टला पंढरपूर येथे होणाऱ्या मंदिर प्रवेश आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. आंबेडकरांनी पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि मठांच्या प्रमुखांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
मंदिर प्रवेश आंदोलनातून हिंदूंच्या नव्या राजकीय धृवीकरणाचे प्रयत्न
कोरोनाच्या प्रकोपापासून राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय असणारी पंढरपूरची वारीही यावर्षी प्रतिकात्मक रूपातच आटोपावी लागली. ऑगस्ट महिन्यात आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरला 'विश्व युवा वारकरी सेने'चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.
वारकरी संत आणि पंढरपुरातील मठाधिशांना आंदोलनात सहभागी होण्याचं साकडं
पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि विविध मठांच्या प्रमुखांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. या आंदोलनात हे घटक सहभागी झाले तर आंदोलनाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी या सर्वांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
अकोल्यातही 'कावडयात्रे'च्या माध्यमातून हिंदूंना चुचकारण्याचा प्रयत्न
प्रकाश आंबेडकरांनी त्यांची राजकीय कर्मभूमी असलेल्या अकोल्यातही हिंदूंच्या आस्थेचा विषय असलेल्या कावडयात्रेच्या विषयाला हात घातला. श्रावणातील शेवटच्या सोमवारी असणरी ही ऐतिहासिक यात्रा सरकारच्या अटींनुसार पार पडली. 76 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या कावडयात्रेला प्रशासनानं कोरोनाचं कारण देत परवानगी नाकारली होती. प्रशासनानं फक्त अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वराच्या मानाच्या पालखीला यात सहभागी होण्याची परवानगी दिली. आंबेडकरांनी शिवभक्तांच्या भावना जाणून घेण्यासाठी थेट राजेश्वर मंदिर गाठलं. त्यांनी शिवभक्तांशी चर्चाही केली अन राजेश्वराच्या गाभाऱ्यात जात अकोल्याच्या ग्रामदैवताचे आशीर्वादही घेतलेत. कावड यात्रेबाबत शासन आणि प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे 17 ऑगस्टला ही यात्रा प्रतिकात्मक पद्धतीनंच पार पडली. मात्र, राजकीय कर्मभूमी असलेल्या अकोल्यात आंबेडकरांनी ही भूमिका घेत भाजपला बॅकफूटवर यायला लावलं.
मंदिर आंदोलनातून शिवसेना आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न
राज्यात भाजप आणि शिवसेना नेहमीच 'हिंदू'केंद्रीत राजकारण करते. मात्र, राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस काँग्रेससोबत 'महाविकास आघाडी' सरकारचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेची यामूळे कोंडी होत आहे. सरकारमधील दोन्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमूळे शिवसेनेची स्थिती 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी परिस्थिती आहे. राज्यातील भाजपचं नेतृत्व असणारे देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीचे प्रभारी झाल्याने त्यांनाही सध्या आंदोलनासाठी वेळ देता येत नाही. तर संघ परिवरातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलही या मुद्द्यावर चुप्पी साधून आहे. या आंदोलनाच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची जबाबदारी म्हणूनच आंबेडकरांनी स्वत: घेतली असावी, असं राजकीय जाणकारांना वाटत आहे. सरकरनं या मुद्द्यावर लवकर तोडगा नाही काढला तर ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस पंढरपुरात अनेक घडामोडींचा असेल. पुढच्या काळात हे आंदोलन पेटतं की सरकार यावर तोडगा काढतं याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मंदिरं का नाही? परंतू एकत्र झुंबड आली तर काय करायचं? : राज ठाकरे