President's Police Medal : राष्ट्रपती पोलीस पदकांची (President's Police Medal) आज (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) एक दिवस आधी म्हणजे आज या पुरस्कार जाहीर झाले आहेत


कोणाकोणाला राष्ट्रपती पोलीस पदक?


राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.


देशातील 901 पोलिसांना पदकं जाहीर


देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.


देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त


फडणवीस सरकारच्या काळात सर्वात प्रभावी अधिकारी देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले. मग 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात IPS अधिकार्‍यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं. 13 डिसेंबर 2022 रोजी देवेन भारती यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर 5 जानेवारी २०२३ रोजी त्यांनी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. महत्त्वाचे म्हणजे मुंबई पोलिसांच्या इतिहासात विशेष पोलीस आयुक्त या पदाची पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली आहे.