लातूर : इंग्रजांनी आपल्याला खूप देणग्या दिल्या. जशी इंडियन रेल्वे, इंडियन पोस्ट सर्विस, इंडियन आर्मी आणि बरंच काही. त्यांना गांधीबाबांनी पळवून लावलं, तेव्हा जाताना ते इथं बरंच काही सोडून गेले. त्यात बाबूगिरी, सरकारीपणा आणि प्रोटोकॉल नावाचा एक प्रकार आहे. ज्या देशात 28 टक्के जनता गरीब आहे, त्या देशात बाबा आदमच्या काळातील प्रोटोकॉल मोठा अडचणीचा ठरतोय. कारण देशभरात जिथं राष्ट्रपती जातात, तिथं राजेशाही सूट तयार होतो. आणि पुन्हा राष्ट्रपती परत येत नाहीत, तोवर तो बंद असतो. या सूटमधून तुमच्या-आमच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे.


 

 
इंग्रज जाऊन 70 वर्ष होत आली. पण या देशानं इंग्रजांचा बडेजाव सोडलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे बदनाम महाराष्ट्रात 8 प्रेसिडेंट सुट तयार करण्यात आलेत. खास करुन राष्ट्रपतींसाठी राखीव असलेल्या या सुटमध्ये केंद्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनाही प्रवेश मिळत नाही. तसा आदेश राज्यपालांनी 2008 ला बजावलाय. शाही प्रेसिडेंट सुटच्या देखभालीवर करदात्यांचे लाखो रुपये दरवर्षी खर्च होतात.

 

 
लातूरला प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी या दोन राष्ट्रपतींनी आठ वर्षात भेटी दिल्या. दोघेही मुक्कामी होते. राष्ट्रपती येणार म्हणून प्रतिभाताईंसाठी दीड कोटी आणि प्रणव मुखर्जींसाठी एक कोटींची साहित्य खरेदी झाली. लातूरच्या प्रेसिडेंट सुटला राष्ट्रपती येऊन गेल्यापासून कुलूप आहे. आतमध्ये प्रवेश नाही.

 

 

काय काय आहे या सुटमध्ये?

 
राष्ट्रपतींसाठी बाथरुमसह सहा एसी

 

बाथरुमपासून हॉलपर्यंत रेड कार्पेट

 

शाही सोफे, बेड, 8 झुंबर खरेदी

 

3 लाखांचे पडदे, 25 हजाराचे हॉट पॉट्स

 

6 वॉर्डरोब, 18 ड्रेसिंग टेबल

 

12 हेअर ड्रायर, छोटा, मोठा फ्रिज

 

दीड लाख रुपयांची तुळशीची रोपं खरेदी

 

 

माहिती अधिकारात ही बाब उघड झाली. प्रतिभाताईंसाठी खरेदी केलेलं साहित्य मिळून येत नाही. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या आत रायगड इमारतीतं प्रेसिडेंशिअल सुट आहे. राष्ट्रपतींशिवाय या सुटमध्ये मुख्यमंत्र्यांना राहता येतं. नाशिक, लातूरसह नांदेड, वर्धा, अमरावती, नागपूर, पुणे जळगावात राष्ट्रपतींच्या नावे प्रेसिडेंशिअल सुट आहेत. राष्ट्रपतींच्या नावे हा थाट आणि त्यातलं हे साहित्य
बघितल्यावर हा देश विक्रमी संख्येनं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, असं कोण म्हणेल?