मुंबई : पुण्यातील एका 18 महिन्यांच्या मुलाचे वजन तब्बल 22 किलो असून श्रीजीत हिंगकर असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या वाढत्या वजनाने चिंतेत असलेल्या वडीलांनी त्याला जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी ही देशातील दुसरी घटना असल्याचे सांगितले.

 

श्रीजीतचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन 2.5 किलो होते. पहिल्या सहा महिन्यात त्याचे वजन वाढून चार किलो झाले. पण त्यानंतर त्याच्या वजनात सातत्याने वाढ झाली. श्रीजीत जेव्हा 10 महिन्यांचा होता, तेव्हा त्याचे वजन 17 किलो होते. सध्या त्याचे वजन 22 किलो आहे.

 

अशा प्रकारची पहिली घटना रिशा अमार कर्नाटकातील मुलीच्या बाबतीत घडली होती. एक वर्षापूर्वी तिला केंब्रिज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी तिचे वजन 18 किलो होते. सध्या तिच्यावर होत असलेल्या उपचारांने तिच्या वजनात घट होऊन सध्या तिचे वजन 16 किलो आहे.

 

श्रीजीतवर उपचार करणारे बालरोग तज्ज्ञ अभिषेक कुलकर्णींनी सांगितले की, श्रीजीत एका दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठीची अधुनिक सामुग्री इंग्लडमध्येच उपलब्ध आहे. जर श्रीजीतवर लवकरात लवकर उपचार झाले नाहीत, तर त्याला इतर आजारांचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.