मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय फोटोसह एक मेसेजही शेअर केला जात आहे. या मेसेजनुसार, नागपूर विमानतळाजवळ मुख्यमंत्र्यांची गाडी अचानक बंद पडली. यानंतर गाडी सुरु करण्यासाठी फडणवीस यांनी स्वत: धक्का मारला.
देवेंद्र फणडवीस सोमवारी (4 जुलै) नागपूरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर जात होते. मात्र विमानतळाजवळ त्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे गाडी सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: धक्का मारला. पण गाडी सुरु झाली नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कारमधून जावं लागलं, असा मेसेज फोटोसह शेअर केला जात होता.
यानंतर 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी या फोटोच्या सत्यतेची पडताळणी केली. या पडताळणीत या व्हायरल फोटो आणि मेसेजचं सत्य वेगळं असल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस बंद पडलेल्या गाडीला धक्का मारत नव्हते, तर त्यांच्या अधिकृत सरकारी गाडीत बसत होते. मात्र त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणे हा फोटो क्लिक केला. त्यानंतर फोटो ट्विटर, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.
शिवाय जर निरखून पाहिलं, तर मुख्यमंत्री ज्या ठिकाणी उभे आहेत, त्याच्या आजूबाजूचा परिसर विमानतळाचा वाटत नाही. तर हा फोटो 4 जुलैचा नाही. कारण मागील 15 दिवसांपासून फोटो व्हायरल होत आहे.
तसंच मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख यांनीही 'एबीपी माझा'च्या पडताळणीला दुजोरा देत, हा फोटो आणि त्यामागची कहाणी चुकीची असल्याचं सांगितलं.