हिंगोली : सिझेरियन होऊन बाळंतीण झालेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त होताच, तिला सरकारी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे कोरोनाचा द्वेष करण्यापेक्षा आजारी लोकांचाच द्वेष करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय रुग्णालय प्रशासनाची बेपरवाई सुद्धा दिसून येत आहे.


दुसऱ्या एका बाळंतीणीने पाच दिवसापूर्वी सिझेरीयन करुन प्रसूत झालेल्या ओल्या बाळंतीणीस चक्क रुग्णालयातून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात आज सोमवारी दुपारी घडला. वसमत शहरातील पठान मोहल्ला भागातील महिला 22 जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सिझेरीयन करत प्रसुतीनंतर तिला कन्यारत्न प्राप्त झाले. कन्यारत्न झाल्याने कुटुंबीय आंनदात होते. मात्र अचानक आज सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालयात धडकले. यानंतर पाच दिवसाच्या ओल्या बाळंतीणीला चक्क एका टॅक्सी ऑटोमध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालयात काढून दिले. हा प्रकार पाहून बाळंतीण भांबावून गेली.


वास्तविक कोरोनाच्या लढयात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य यंत्रणेला देवस्वरुप स्थान दिले जात असताना हा संतापजनक प्रकार घडावा, हे निंदनीय आहे. स्त्री रुग्णालयातून प्रसुती झालेली महिला रिक्षातून आल्यानंतर तिथे बाळंतीणीसमोर प्रश्नाची सरबत्ती सुरु झाली. तुम्ही बाळंतीण असताना इथे कशाला आल्या म्हणत सदर महिला पुन्हा त्याच रिक्षातून महिला रुग्णालयात पोहोचली. हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरत जाब विचारताच प्रकरण अंगलट येईल, असे दिसताच रुग्णवाहिका बोलावून महिलेला उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन घेतले. आता महिलेच्या सोबतच्या नातेवाईकांना क्वॉरंटाईन होण्याचा सूचना देण्यात आल्या असून रिक्षाचालकाचा शोध सुरु झाला आहे.


दरम्यान स्त्री रुग्णालय प्रसूत झालेल्या बाळंतीणीला आणि पाच दिवसाच्या चिमुकलीला ज्या पद्धतीची वागणूक दिली ती चुकीची असून यातून स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवून नागरिकांचे जीव धोक्यात आणल्याप्रकरणी संबधित डॉक्टर, जबाबदार कर्मचाऱ्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष नदीम सौदागर, एमआयएमचे युवक शहराध्यक्ष पठाण यांनी उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.