कोल्हापूर : राम जन्मभूमीचा संघर्ष हा गेल्या पाचशे वर्षांपासून सुरू आहे. मात्र काहीजण सर्वकाही आम्हीच केल्याचा दावा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राम जन्मभूमी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ऑनलाईन पद्धतीने व्हावा, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली. संदर्भात बोलताना दादा म्हणाले की, संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. तीन कोटी नाही किमान तीनशे लोकांनी तरी प्रत्यक्ष जाऊन हा सोहळा पार पाडावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे.
आता शिवसेनेला अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करावं लागेल
राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रणाची गरज नाही, असे संजय राऊत सांगत सुटले होते. मात्र आता निमंत्रण मिळाल्याने उद्धव ठाकरे यांची गोची झाली आहे. कारण दोन्ही सहयोगी पक्षांना सांभाळायचं की अयोध्येला जायचं ,असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल. आगामी काळात सेनेला राष्ट्रवादी बरोबर मत मागायची असतील तर त्यांची मुस्लीम मतं सेनेला मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे आता शिवसेनेला अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करावं लागेल. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वा पेक्षा खुर्ची महत्त्वाची असल्याची टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षण सुनावणीवरून सरकारवर टीका
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणावरून सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली. आज खरंतर निकाल लागेल, असं वाटत होतं. मात्र सरकारच्या वकिलांनी तारीख वाढवून मागितली आणि याचं कारण होतं ते म्हणजे सरकारकडून पुरेशी कागदपत्र मिळाले नसल्याचे. मग इतके दिवस सरकार आमची पूर्ण तयारी झाली आहे, असे का सांगत होते? याचे उत्तर द्यावे. निकाल लागेपर्यंत आता मराठा आरक्षण गृहीत धरून नोकर भरती करता येणार नाही. त्यामुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या मराठा समाजाच्या तरुणांची घोर निराशा झाली आहे. मात्र मी मराठा समाजाच्या तरुणांना पॅनिक न होण्याचे आवाहन करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आपण संयम बाळगा, असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी आज केलं आहे.
संबंधित बातम्या