Pravin Darekar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून टीका होत आहे. भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगेंचा समाचार घेतला असून मनोज जरांगे हे महाविकास आघाडीचं प्यादं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) आरोप केला आहे. 


प्रवीण दरेकर म्हणाले की, आज भाजपची बैठक झाली. या बैठकीत जरांगे जे बोलत आहेत त्यावर भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. रोहित पवार, राजेश टोपे, शरद पवार हे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर देखील आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. 


...तर खपवून घेतले जाणार नाही


उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण देऊ शकले नाही. मराठा समाजाच्या भावना समजून 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावर टीका करत असाल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 


मनोज जरांगे मविआचं प्यादं


आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र प्रसिध्दीची नशा काहींना चढली आहे. त्यातून हे फ्रस्ट्रेशन आहे. विषय संपल्यावर परत का? तो विषय काढला. मनोज जरांगे हा महाविकास आघाडीचा प्यादा आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 


जरांगे पाटलांचा तोल ढासळतोय, स्वतः ला आवर घाला - विक्रांत पाटील


जरांगे पाटील यांच्या विषयी मराठा समाजाच्या मनात असलेला आदर आता संपत चालला आहे.त्यांचे सहकारी आता त्यांची कटकारस्थाने उघड करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या नजरेतून जरांगे पाटील उतरत चालले आहेत. ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या आणि ते हाय कोर्टात टिकवून दाखवणाऱ्या तसेच जे ओबीसींना त्याच सगळ्या योजना मराठ्यांना असा न्याय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीला जाऊन टीका केली जात आहे. हे सहन केले जाणार नाही. कोणत्याही गोष्टीला सहन करण्याची एक सीमा असते ती सीमा जरांगे पाटलांनी ओलांडू नये, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


'कोण कोणाची तुतारी वाजवतंय, हे महाराष्ट्राला कळून चुकलंय'; जरांगेंच्या आंदोलनावरून शिवसेनेचा शरद पवारांवर निशाणा