Prataprao Chikhalikar on Ashok Chavan Resigns: नांदेड : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) काँग्रेसची साथ सोडून भाजपची (BJP) साथ देण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये (Nanded News) सोशल मिडीयावर मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल  नार्वेकरांची (Rahul Narwekar) भेट घेतल्याची माहितीही मिळत आहे. आजच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.


अशोक चव्हाणांचे नांदेडमधील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही, असं म्हणत अशोक चव्हाणांना टोला लगावला आहे. तसेच, भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात, असंही चिखलीकर म्हणाले. 


प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले? 


अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असं भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात असंही चिखलीकरांनी सांगितलं.  


अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर आजूबाजूच्या लोकसभांवर प्रभाव पडेल असं म्हटलं जातं, यावर चिखलीकर म्हणाले, फार काही फरक पडेल असं नाही. तिन्ही मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे खासदार आहेत. अशोक चव्हाणांना हरवून मी खासदार झालो आहे, त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. पण थोडी बळकटी येईल, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.  


लातूरची, हिंगोलीच, धाराशिवची जागा महायुतीने जिंकली आहे. त्यांच्या येण्याने भाजपला बळकटी येईल, त्यांनी अनेक वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, अशी सावध प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.


चिखलीकरांमुळे चव्हाणांचा 2019 मध्ये लोकसभेत पराभव 


प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन तगडे उमेदवार. चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांच्या रूपानं भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला. 2019 ला चिखलीकर यांना भाजपनं मैदानात उतरवलं आणि अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान उभं केलं. चिखलीकर यांनी 4 लाख 86 हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमकेर ठरले ते वंचितचे उमेदवार, ज्यांनी 1 लाख 66 हजार मतं घेतली. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार मतं मिळाली. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला हा दुसरा पराभव ठरला. याआधी डॉ. व्यंकटेश काबदे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भाजपनं लोकसभेची जागा ही 2004 नंतर 2019 ला जिंकली होती. 


नांदेडचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात अशोक चव्हाणांची मोठी भूमिका 


मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे (Nanded Lok Sabha Election) पाहिलं जातं. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृह मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नांदेड. पुढे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हा पूर्ण जिल्हा आपल्या हातात ठेवला, त्याच्यावर एकहाती वर्चस्व ठेवलं. काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. मुख्यमंत्रीपदी विराजमन असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा ते विधानसभापर्यंत काँग्रेसला अच्छे दिन आणलेले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


 Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा? चव्हाण यांच्या निर्णयावर ठरेल नांदेडच्या लोकसभेचा निकाल