मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या होत्या पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी!
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत एक चारोळी पोस्ट केली आहे. 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?' अशी चारोळी रामदास आठवलेंनी ट्वीट केली आहे. आठवले यांनी केलेल्या या ट्वीटवर रिट्विट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवारांची तीन तासांची भेट... भेटीत काय झालं? काय म्हणाले नेते?
प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट
प्रशांत किशोर यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 11 जून रोजी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे. बिगर भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का, त्यांची मोट कशी बांधता येईल? शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का? याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे.
काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी त्यांचं क्षेत्र सोडलं आहे. पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं भेटत असतात, असं ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला निवडणुकांमध्ये यश मिळालं आहे. ते जाणून घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. या बैठकीत गैर काय आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तर छगन भुजबळ म्हणाले की, प्रशांत किशोर यांचा निवडणुकीबाबत चांगला हातखंडा आहे. मात्र शरद पवार आणि त्यांच्या भेटीत काय घडलं याबाबत कल्पना नाही, असं ते म्हणाले.
Prashant Kishor : प्रशांत किशोर-शरद पवार बैठकीत गैर काय? संजय राऊत यांचा सवाल