मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.  पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते.  भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे. 


बिगर भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का, त्यांची मोट कशी बांधता येईल? शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का? याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे.


Prashant Kishore-SRK Meeting: शाहरुख खानलाही भेटणार प्रशांत किशोर? वेबसीरिजसंदर्भात चर्चेसाठी भेटीची शक्यता


काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी त्यांचं क्षेत्र सोडलं आहे. पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं भेटत असतात, असं ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला निवडणुकांमध्ये यश मिळालं आहे. ते जाणून घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. या बैठकीत गैर काय आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तर छगन भुजबळ म्हणाले की, प्रशांत किशोर यांचा निवडणुकीबाबत चांगला हातखंडा आहे. मात्र शरद पवार आणि त्यांच्या भेटीत काय घडलं याबाबत कल्पना नाही, असं ते म्हणाले.


शरद पवार- प्रशांत किशोर भेटीवर बोलण्यास चंद्रकांत पाटलांचा नकार


दरम्यान शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातल्या भेटीवर मात्र बोलण्यास चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला आहे. ती भेट शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील आहे. त्यावर मी बोलणं योग्य नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.


Prashant Kishor : प्रशांत किशोर-शरद पवार बैठकीत गैर काय? संजय राऊत यांचा सवाल

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची ही भेट का महत्वाची 


2024 लोकसभा निवडणुकीआधी भाजप विरोधात जर आघाडी तयार करायची असेल तर ती कशी असली पाहिजे. त्याच्या तयारीसाठी ही भेट महत्वाची ठरू शकेल.


प्रशांत किशोर यांनी याआधी नरेंद्र मोदी,  पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहार मध्ये नितीश कुमार तर 2019 विधान सभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राजकारण,निवडणूक जिंकण्याचे डावपेच याचा प्रशांत किशोर यांचा दांडगा अभ्यास आहे.


पुढच्या वर्षी देशात महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाचं असणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशबरोबर पंजाब, उत्तराखंड, गोवा यासारख्या राज्यांच्या निवडणुका आहेत. या राज्यातही भाजप विरोधात आघाडी करता येऊ शकते का?


एकूणच भाजप विरोधात निवडणुकीच्या रणनीतीमध्ये मात देणारा  म्हणून प्रशांत किशोर यांचा चेहरा आहे. त्यांनी भाजप विरोधात सरकार स्थापन करण्याचा प्रयोग करणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतल्यामुळेच राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेत आली आहे.