मुंबई : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (prashant Kishore) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांची भेट घेतली. सध्या राजकीय भेटी गाठींचं केंद्र ठरत असलेलं सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील बैठक तीन तासांनी संपली. शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर हे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची (shahrukh khan) भेट घेणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांच्या जीवनावर आधारीत एक वेब सीरीज शाहरुख खानची कंपनी रेड चिलीजकडून बनवण्याची योजना आहे. यावर अद्याप प्रशांत किशोर यांची परवानगी मिळाली नसल्याची माहिती आहे. यामुळं आज प्रशांत किशोर आणि शाहरुख खान यांची भेट 'मन्नत' मध्ये होऊ शकतो. ही भेट सायंकाळी सात वाजता होण्याची शक्यता आहे.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, "मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे,"
पश्चिम बंगाल निवडणूकीत प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला
"पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनितीकार म्हणून काम सोडेन," असं निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करुन ठेवलं होतं. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, अखेर निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला.
प्रशांत किशोर यांची कारकीर्द
निवडणूकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.