सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे. कोकणात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तीभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांन्ह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील पेंढूर गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतात पूजा करण्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी राबतो, कसतो त्या शेतामध्ये नारळ, आंब्याची पाने, साखर, देवाला अर्पण करून देवाला साकडं घातलं जात. त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. प्रामुख्याने शेतीच्या कामांना सुरुवात करताना कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, आपल्या जनावरांना सुद्धा कोणतीही इजा होऊ नये तसेच शेतामध्ये आपण शेती करतो ती शेती योग्य प्रकारे व्हावी यासाठी श्रीफळ देवाला अर्पण करून शेतीला सुरुवात केली जाते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे. यासाठी शेतकरी वर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो.


‘‘बा देवा महाराजा, या स्थळाच्या राखणदाराचा सालाबादप्रमाणे तुझी लेकरा आता शेतीक सुरवात करतली हत, मुलाबाळांची, शेतीची तूच रखवाली कर, आज तुका भरलेला फळ आणि भक्ष ठेवलेलो आसा तो पावन करून घे रे महाराजा’’ 


कोकणात जिथे जिथे खरिपाची शेती केली जाते, त्या-त्या शिवारात आता ‘राखणीच्या’ गा-हाण्याचे सूर कानी पडत आहेत. कित्येक घरांच्या अंगणात (परड्यात) सुद्धा ही राखण देण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांची अथवा आपले रक्षण करणाऱ्या शक्तीची वर्षातून एकदा आठवण, स्मरण वा पूजन करणे हा या मागचा हेतू आहे. यात माहेरवाशिणीच्या राखणीपासून ते विविध चाळ्यांच्या नावाने बळी देण्याची प्रथा आहे. शेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे यासाठी शेतकरीवर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर कोंबड्याचा बळी देतो व मनोभावे प्रार्थना करतो. या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्या अज्ञात शक्तीवर टाकतो.


राखणीमध्ये दोन प्रकार असतात. एक बळीची राखण व दुसरी केवळ श्रीफळ वाढवून दिली जाणारी राखण. शाकाहारी मंडळी केवळ हातभेटीचा नारळ वाढवून राखण देतात. बळीची राखण मांसाहारा दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार व रविवारी दिली जाते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. विविध जातीची भाताची पीक जिल्ह्यात घेतली जातात. बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. मात्र, आधुनिकीकरणात जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. तर चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात बचतगटाना दिलेल्या आधुनिक भात लावणी यंत्राच्या साहाय्याने काही ठिकाणी भाताची लावणी केली जाते.