मुंबई:  "प्रत्येक मुलीला भविष्याचा विचार असतो, मलाही आहे. प्रत्येक मुलीने टाइम लिमीट ठरवलेली असते, मी ही ठरवली आहे. लग्नाचा विचार मी सुद्धा केला आहे, पण योग्य वेळ येईल तेव्हाच लग्न करेन", असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. त्या 'माझा कट्टा'वर बोलत होत्या.


समाजकारण ते राजकारण, शालेय जीवन ते कॉलेज लाईफ, आवडते छंद ते आवडता हिरो अशा सर्व विषयांवर प्रणिती शिंदे यांनी गप्पा मारल्या.

सुशीलकुमार शिंदे कट्ट्यावर आले होते, त्यावेळी सांगितलं होतं, प्रणितीवर लग्नासाठी दबाव नसेल, कोणत्याही जाती-धर्मातील नवरा तिने निवडावा, तर तुमचा भविष्याचा विचार काय? असा प्रश्न प्रणितींना विचारण्यात आला, त्यावर प्रणितींनी लग्नाबाबतचं उत्तर दिलं.

सलमान खान आवडता हिरो

मला वाचनाचा छंद आहे. जुनी गाणी ऐकायला आवडतात. सध्या शाहरुख खानचा रईस सिनेमा पाहिला, मात्र मी सलमान खानची फॅन आहे, असं प्रणिती शिंदेंनी सांगितलं.

याशिवाय मंगेश पाडगावकर, रामदास फुटाणे यांच्या कविता-कार्यक्रमांना हजेरी लावली, तर 'त्या फुलांच्या गंधकोषी' ही कविता सर्वात आवडती असल्याचंही प्रणिती म्हणाल्या.

राजकारणात प्रवेश कसा झाला?

जसं डॉक्टरच्या घरचं वातावरण डॉक्टरीचं असतं, तसं राजकारण्यांच्या घरात राजकीय वातावरण असतं. लहानपणापासूनच समाजसेवेची सवय होती. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीवेळी अडचणी येत होत्या. त्याचमुळे 28 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात प्रवेश केला, असं प्रणिती यांनी सांगितलं.

"लोकांची सेवा करण्याच्या हेतूने राजकारणात आले. वय नव्हे तर अनुभव महत्त्वाचा आहे. अजून मी शिकते आहे, अनुभव घेत आहे", असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

वडिलांची पुण्याई मान्य, पण कष्टाला पर्याय नाही

पहिली निवडणूक वडिलांच्या पुण्याईने जिंकली. मात्र केवळ तेच साधन नाही, कष्टाला पर्याय नाही. घराणेशाही असली तरी लोकशाहीत ती टिकायला हवी. तुम्ही काम केलं, तरच लोकशाहीत टिकते, अन्यथा लोक तुम्हाला घरी बसवतात. मी कामं केली त्यामुळेच दुसऱ्यावेळीही विधानसभा निवडणुकीत निवडून आले, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

आमच्यासारखं स्वातंत्र्य सर्वांना मिळावं

आम्हा तिन्ही बहिणींचं शिक्षण मुंबईत झालं. मात्र कधीही लाल गाडी सोडायला आली नाही. तिन्ही बहिणी विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्हाला वडिलांनी किंवा घरच्या कोणीही कशासाठीही दबाव आणला नाही. आम्हाला हवं ते स्वातंत्र्य मिळालं. मात्र आम्हाला जसं स्वातंत्र्य मिळालं, तसं स्वातंत्र्य प्रत्येक मुलीला मिळावं, अशी अपेक्षा, प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली.

वडिलांनी कधीही आमच्यावर हात उचलला नाही, ते कमी बोलतात, पण जे बोलतात ते अंतिम असतं, असंही प्रणिती म्हणाल्या.

काँग्रेस मार्केटिंगमध्ये मागे पडली

निवडणुकीमध्ये काँग्रेस मार्केटिंगमध्ये कमी पडली. मात्र आता युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर भर देण्यावर लक्ष असेल. भाजपवाले, खोटं बोलणारे रेटून बोलून गेले, असं प्रणिती शिंदेंनी नमूद केलं.

सोशल मीडिया वापरत नाही 

मी सोशल मीडिया वापरत नाही. आता-आता ट्विटरवर आले आहे. माझं फेसबुक अकाऊंट नाही, असं सांगत, सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला असला, तरी जबाबदारीचं भान सर्वांनी ठेवायला हवं, असा सल्ला प्रणिती शिंदेंनी दिला.

माझ्याशी सोशल मीडियावरुन संपर्क साधण्यापेक्षा, माझा फोन 24 तास सुरु असतो, तिकडे सहज संपर्क साधू शकता, असंही त्या म्हणाल्या.

MIM आणि RSS एकसारखेच

MIM सारखे पक्ष जातीयवाद निर्माण करतात, समाज विभागण्याचे काम असे पक्ष, संघटना करतात. देशाच्या अखंडतेत बाधा आणणारे MIM आणि RSS सारखेच आहेत, असा घणाघात प्रणिती शिंदेंनी केला.

पक्षापेक्षा मोठी नाही 

सोलापुरात माझ्यावर आघाडी तोडण्याचा आरोप झाला. मात्र आघाडी तोडण्याइतपत मी मोठी नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

तसंच पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, पक्षासोबत एकनिष्ठ नसणाऱ्यांना पक्षातून जाण्यापासून थांबवू शकत नाही, असंही प्रणिती शिंदेंनी नमूद केलं.

मी आधीपासून आक्रमक, आता संयमी

राजकीय विचाराबाबत घरी वडिलांसोबत संघर्ष होतात. वैचारिक वाद-विवाद होतो, पण त्यांचा अनुभव जिंकतो, अशी प्रांजळ कबुली प्रणिती शिंदे यांनी दिली.

मी आता जरी शांत संयमी दिसत असले, तरी आधीपासून आक्रमक आहे. आता शांत आणि संयमी झाले आहे, ऐकून घेण्यास शिकत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय वडील सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय कारकीर्दीत कधी कुणाला दुखावलं नाही, मी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

पद-प्रतिष्ठेमुळे सहजता नाही

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची मुलगी असल्यामुळे समाजात वावरताना सहजता मिळत नाही. जर एखादेवेळी सिनेमा पाहायचा असेल, तर सिक्युरिटी किंवा पदाच्या ओझ्यामुळे ते पाहता येत नाही, अशी खंत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली.

वडिलांमुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. बोलताना, समाजात वावरताना आपल्याकडून काही चूक होणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. आपण जे आहोत ते लोकांमुळे आहे, ते जेव्हा विसरु तेव्हा सर्वस्व गमावू, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा

भाजप सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. मात्र कोणतंतरी अॅप शोधून त्यावर ते मतदान घेतात. पण त्यांनी अॅपवर शक्ती दाखवण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला तुमची शक्ती कळेल, असं आव्हान प्रणिती शिंदेंनी दिलं.

राहुल गांधींकडे व्हिजन

राहुल गांधी हे व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. मात्र आता त्यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेण्याची वेळ आली आहे, असं प्रणिती म्हणाल्या.

सोलापूर स्मार्ट सिटी

आम्ही सोलापुरात अनेक कामं केली, त्यामुळेच सोलापूरची स्मार्ट सिटीत निवड झाली. मात्र आता सोलापुरात भाजप सत्तेचा गैरवापर करतंय, निधी अडवून ठेवलाय, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला.

इंदिरा गांधींची कार्यशैली सर्वाधिक आवडती

इंदिरा गांधी यांची कार्यशैली सर्वाधिक भावते. इंदिरांसारख्या कणखर महिलेने भारतासारख्या देशाचं पंतप्रधानपद भूषवलं ही मला अभिमानाची बाब वाटते. त्यांच्याबाबत जे काही वाचलं, त्यापासून प्रेरणा मिळाली, त्यामुळे इंदिरा गांधीच माझ्या आवडत्या नेत्या आहेत, असं प्रणितींनी नमूद केलं.

मुख्यमंत्री अजूनही विरोधकाच्या भूमिकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते आमदार असतानाही पाहिलं. त्यांचा चांगला अभ्यास आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन ते अद्याप विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाहीत, असा टोला प्रणिती शिंदेंनी लगावला.

संबंधित बातमी

प्रणिती, नवरा कुठल्याही जातीचा कर, पण...: शिंदे