ईडी, सीबीआयचा मोदी गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं: प्रकाश आंबेडकर
Narendra Modi : ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय.

Prakash Ambedkar On Narendra Modi : ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलेय. नरेंद्र मोदी हे ईडी, सीबीआय किंवा आयकर यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही, ते जे करत आहेत ते त्यांच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. ज्यांच्या विरोधामध्ये हे सगळं सुरू आहे त्यंनी याआधी तसं वागल्यामुळे ते सुरू आहे, या कारवायात काहीही गैर नाही, या आधीपण अशाच कारवाया झालेल्या आहेत. कोणीही सत्ता राखण्यासाठी जे करतो तेच नरेंद्र मोदी करत आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे एकत्रित येतील हा माझा अंदाज आहे. त्याची कारणे विविध चौकशामध्ये आहेत. त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जर भाजपचा तुम्हाला पराभव करायचा आहे तर तुम्ही एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका घेताना दोन्ही काँग्रेस दिसत नाही, असे प्रकाश आंबेकर म्हणाले. मी माझी मतं यापूर्वी पण व्यक्त करत आहे. इथून पुढे पण मला जे वाटतं तेच बोलत राहणार, असेही ते म्हणाले. शरद पवारांबद्दलच्या वक्तव्यावर आजही आपण कायम असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये मध्यावती निवडणुका होतील अशी शक्यताही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. माझी भूमिका वैचारिक आहे. ज्यांना सत्तेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तो लाभ मिळायला हवा, असेही ते म्हणाले. शरद पवार यांच्यासोबतच्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, माझे शरद पवार यांच्याशी वाद नाहीत. माझ्या त्या दिवशीच्या मुलाखतीवर कोणी काहीही बोललेले नाही. शरद पवारही शांत आहेत, असेही प्रकाश आंबेकर म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे होते, ते झालेले नाही, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलेय. संजय राऊत यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारला असता ते म्हणाले की कोण आहेत संजय राऊत? ते आमच्या पक्षाचे नेते नाहीत. त्यांनी मला सांगू नये.






















