अकोला : कोरोनासंदर्भात राज्यात उडालेल्या बोजवाऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सध्या महाराष्ट्र शासन पुर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामती पुरतीच असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला आहे. यामुळेच उच्च न्यायालयावरच सर्व आदेश देण्याची वेळ आली, असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ते अकोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 


प्रकाश आंबेडकरांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनावरून देशात आणि राज्यात उडालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टिका केली. महाराष्ट्रात यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची कोणतीच बैठक अद्यापपर्यंत झाली नसल्याचं आंबेडकर म्हणालेत. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट होणंही दुरापास्त झालं आहे. या परिस्थितीत किमान यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं या समितीतील सदस्यांची नावं सरकारनं जाहीर करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 


तिसऱ्या लाटेत बालकांना जपण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत : प्रकाश आंबेडकर 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र आणि राज्यातील सरकारनं तयारीच केलेली नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. दुसऱ्या लाटेत उभी केलेली व्यवस्था मोडीत काढल्याने दोन्ही सरकारांवर त्यांनी हलगर्जीपणाचा आरोप केला. यामुळे दोन्ही सरकारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असंही आंबेडकर म्हणालेत. तिसऱ्या लाटेत लहान बालकं बाधित होण्याची मोठी शक्यता आहे. मात्र, राज्य सरकारने यासंदर्भात कोणतीच पावलं उचललेली दिसत नसल्याचं आंबेडकर म्हणालेत. यासंदर्भात अकोल्यात या अनुषंगाने प्रशासन आणि शहरातील बालरोगतज्ज्ञ तसेच औषध कंपन्यांच्या मदतीने उपचारांचं एक आदर्श मॉडेल तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं आंबेडकर म्हणालेत. यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाकडे तयार झालेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड झालेल्या लहान बालकांसाठी आरक्षित करण्याची मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे. 


प्रत्येक रूग्णालय आणि डॉक्टरांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी द्यावी. अशा उपचारांसाठी डॉक्टांवर सक्ती करावी. यासोबतच कोविड रुग्णांवर उपचारांसाठी सर्व डॉक्टर आणि दवाखान्यांवर सक्ती करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे. सोबतच कोविड केअर सेंटर ही संकल्पना मोडीत काढत प्रत्येक रूग्णालयातच कोविडवर उपचार व्हावेत, असं आंबेडकर म्हणालेत. 


कोरोनावरून केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा 


देशातील उत्तरप्रदेश, गुजरात आणि गोव्यांसारख्या भाजपशासित राज्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे आलेलं अपयश हे फक्त मोदींच्या बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे आल्याचं आंबेडकर म्हणालेत. मोदींच्या संभाव्य लसीकरण महोत्सवावरही त्यांनी कठोर टीका केली. मोदींना फक्त इव्हेंटमध्ये रस असल्याचा टोला आंबेडकरांनी केंद्राच्या लस महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे. लसींचा तुटवडा निर्माण होणं हा मोदी सरकारचा गाफीलपणा आहे. लसींमधील अंतर 28 दिवसांवर 84 दिवसांवर न्यावं लागणं हा त्याचाच परिणाम असल्याचा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. या सरकारकडून तज्ञ लोकांचं मत विचारात घेतलं जात नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचं निरिक्षण अगदी खरं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. 


देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातच बसावं : आंबेडकर


सध्या माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात कोरोना स्थितीचा आढावा घेत फिरत असल्याच्या प्रकारावरही आंबेडकरांनी टीका केली. फडणवीसांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि कोरोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं, असा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावला. फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत, असा सल्ला यावेळी आंबेडकरांनी फडणवीसांना दिला आहे. 


कोरोना झाल्यावरचा आपला दुपारचा आहार संघप्रमुखांनी सांगावा : प्रकाश आंबेडकर


दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या कोरोना आहार आणि उपचारांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोरोना काळात घेतलेला दुपारचा आहार जाहीर करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली. सोबतच त्यांच्यावर कोणत्या डॉक्टरांनी उपचार केलेत ते भागवत यांनी सांगावं, असा चिमटाही आंबेडकरांनी भागवतांना घेतला आहे. आंबेडकरांच्या या मागणीवर आता संघ वर्तुळातून कोणत्या प्रतिक्रीया उमटतात का?, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :