पंढरपूर : उजनी धरणातील पाणी इंडपूरला नेण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा रक्तरंजित आंदोलन सुरू होईल असा इशारा शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.  आज उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने आमदार पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब व हलगी नाद आंदोलन करण्यात आले. यानंतर ते बोलत होते . 
         
राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असून जिल्ह्याची नरडी दाबली.आघाडी सरकारचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत असल्याचा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. दुष्काळी सोलापूर जिल्हा पाण्यासाठी केवळ उजनी धरणावर अवलंबून असताना यातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा चुकीच्या पद्धतीने प्रयत्न सुरू असून यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने 600 कोटी रुपये दिलेच कसे असा सवाल शहाजीबारू पाटील यांनी विचारला आहे. 
 
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी योजनेस ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे.  त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच कळीच्या मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर उजनीच्या पाण्यावरून  जोरदार टीकास्त्र सोडत सरकारला घरचा आहेर दिला आहे.


उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यास उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर आज पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास आपला  तीव्र विरोध असल्याचे सांगितले. पाटील  म्हणाले की, उजनीचे पाणी इंदापूरला मंजूर करताना जिल्ह्यातील एकाही  आमदाराला विश्वासात घेतले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आघाडी सरकारने अन्याय केला आहे. 


राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी  बारामतीला  वळवून न्यायचा  आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे असं सगळ्या  देशभर सांगत फिरायचं  ही पवारांची राजकीय  पद्धत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला, मात्र पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.


शरद पवार यांनी  उजनी धरणातून  बारामती एमआयडीसी,  बारामती शहर आणि  सिनर्मास प्रकल्पांना पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतंय  असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची  काय यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं, अशी जोरदार टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. येत्या काळात उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.