सोलापूर : एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर सोलापुरातील आष्टीत सुरु असलेल्या आंदोलकांना प्रशासनानं आज लेखी आश्वासन दिलं. आष्टी उपसा सिंचन योजनेतून कालव्यात पाणी सोडलं जावं, यासाठी गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण छेडलं होतं. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु होतं.
एबीपी माझानं शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवला. अखेर आज प्रशासकीय यंत्रणेनं आंदोलनस्थळी जावून लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर उपोषण मागे घेत आंदोलकांनी एबीपी माझाचे आभार देखील मानले.
गेल्या दहा दिवसांपासून प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरु होतं. दोनच दिवसांपूर्वी उपोषणादरम्यान प्रभाकर देशमुख यांची प्रकृती खालावल्याने भाजप खासदार शरद बनसोडे यांनी कालव्यात उतरुन देशमुखांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची हात जोडून विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत प्रभाकर देशमुख आपल्या उपोषणावर ठाम होते.
अखेर प्रशासकीय यंत्रणा आंदोलन स्थळावर दाखल झाली. मागण्यांच्या पूर्ततेचं लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. भीमा कालवा मंडळाच्या अध्यक्षांनी सरबत पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.