भिवंडी : हुंडा देण्याघेण्याच्या प्रथेचे अनेक बळी आजवर महाराष्ट्रानं पाहिले आहेत. त्यातलंच ताजं उदाहरण म्हणजे शीतल वायाळ. शीतलसारखीच परिस्थिती भिवंडीमध्ये एका मुलीवर ओढावली. साखरपुडा होऊन तिचं लग्न मोडलं, पण मोठ्या धैर्यानं ती या संकटाला सामोरं गेली.


12 मार्चला ललिताचा साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली 1 मे. मुलगा एचडीएफसी बँकेत नोकरी करणारा शहापूरचा भास्कर वेखंडे. साड्या खरेदी झाली, मानपानाचे कपडे झाले, मुलाचे कपडे झाले, सोने खरेदी झाली... इतकंच काय लग्नपत्रिका छापून त्या वाटल्यासुद्धा. पण तितक्यात तिच्या आनंदावर विरजण पडलं.

ललिताला कॉफीशॉपमध्ये बोलावून भास्करने हुंड्याची मागणी केली, असं ललिताच्या वडिलांनी सांगितलं. भिवंडीतल्या कळंबोळी गावात ललिताचे वडिल हे शेतीसोबत प्लंबिंगचं काम करतात. तर ललिता ही मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते.

ललिताच्या घरच्यांनी भास्करच्या घरच्यांना समजावण्याच्या प्रयत्न केला. पण ते मानायला तयार नव्हते. अखेर मोठ्या धीरानं ललिताच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पैसा जमवून, कर्ज काढून लग्नाचा खर्च उचलला. त्यावर हुंडा मागणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, असं ललिता निक्षून सांगते.

शीतल वायाळनं कर्जबाजारी वडिलांना लग्नाचा भार नको म्हणून आयुष्य संपवलं. पण आज शीतलरुपी ललिता मोठ्या धैर्यानं या संकटाला सामोरं जात आहे. हुंडा देणार नाही अशी भुमिका तिनं घेतली मात्र हुंडा घेणार नाही असं ज्यावेळी प्रत्येक नवरा मुलगा म्हणेल त्याचवेळी क्रांती घडेल.