गुरुदास कामत हे सध्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. तर त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिव या राज्यांची जबाबदारी आहे. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. त्यांनी या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आणि मतदानाच्या दिवशीही आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं, अशी मागणी राहुल गांधींकडे केली होती. त्यानुसार आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कामत यांनी ट्वीटरवरुन दिली.
दरम्यान यापूर्वीही गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर 15 दिवसातच त्यांनी हा निर्णय मागे घेतला. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते.
गुजरातच्या प्रभारीपदावरुन हटवल्याने नाराजी?
गुरुदास कामत यांच्याकडे सध्या गुजरातचं प्रभारी पद आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने गुजरातची जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे दिली आहे. गुजरातची जबाबदारी काढून घेतल्याने कामतांनी राजीनामा दिला का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:
- 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
- 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
- पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
- 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
- केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
- 2014 साली शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव